लासलगाव–विंचूरसह १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या सोलर प्रकल्पाचे लोकार्पण

Share:
Main Image
Last updated: 10-Apr-2026

लासलगाव, विंचूर (प्रतिनिधी) १० एप्रिल - लासलगाव विंचूरसह १६ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आल्याने योजनेतील वीज बिलात बचत होणार आहे. वीज बिलातील खर्च अधिकाधिक कमी करण्याच्या दृष्टीने या सौर ऊर्जा प्रकल्पाची क्षमता अधिक वाढविण्यात येईल असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले. 

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून रेट्रोफिटिंग योजनेअंतर्गत  २८ कोटी ३५ लाख रुपये निधीतून लासलगाव, विंचूरसह १६ गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे नूतनीकरण करण्यात येत आहे. या योजनेच्या आधुनिकीकरणाचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून विजेचा वाढता खर्च कमी करण्यासाठी सौरऊर्जेवर आधारित प्रकल्प उभारण्यात आला असून, त्याचे लोकार्पण आज माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते विंचूर औद्योगिक वसाहतीतील फिल्टर प्लांट परिसरात करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी योजनेचे अध्यक्ष जयदत्त होळकर, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, सरपंच सचिन दरेकर, सरपंच तुकाराम जाधव, सरपंच योगिता पाटील, सरपंच भारती गवळी, सरपंच अश्विनी जाधव, सरपंच आरती कडाळे, मंगेश गवळी, पांडुरंग राऊत, विलास गोरे, रामनाथ शेजवळ, बालेश जाधव, मकरंद सोनवणे, सीमाताई दरेकर, किशोर जेऊघाले, संतोष राऊत, कैलास राऊत, वैभव दरेकर,  मिलिंद वाघ,  दत्तात्रेय खाडे, ओम राऊत, नागेश निकाळे, विजेंद्र निकाळे,  सोहेल मोमीन, महेंद्र पुंड,  इस्माईल मोमीन, रामभाऊ जगताप, माधव जगताप, सागर गरड यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, अभियंते, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. 

Advertisement

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना दीर्घकालीन आणि शाश्वत पद्धतीने चालवायच्या असतील तर विजेचा खर्च नियंत्रित ठेवणे अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर फिल्टर प्लांट येथे ६९ केव्ही सोलर प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. तसेच नांदूर मध्यमेश्वर येथील १४० केव्हि सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम देखील पूर्णत्वाकडे असून त्याचेही लोकार्पण लवकरच होणार आहे. सध्या या माध्यमातून सुमारे ३० टक्के वीजबिलात बचत होणार आहे. “आपण केवळ या टप्प्यावर न थांबता येत्या काळात या प्रकल्पाची क्षमता वाढविण्याचा मानस असून, त्याद्वारे अधिकाधिक वीज बचत साध्य केली जाईल. परिणामी या १६ गावांना अखंड, सुरळीत व गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा सुनिश्चित होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलस्रोतांपासून पाणी उपसा, शुद्धीकरण, साठवण आणि वितरण या सर्व घटकांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. जुन्या यंत्रणेमुळे होणारी पाण्याची गळती, विजेचा अपव्यय व तांत्रिक अडचणी दूर करून अत्याधुनिक प्रणाली उभारण्यात येत आहे. यामध्ये फिल्टर प्लांटचे नूतनीकरण, नवीन पाईपलाईन टाकणे, पंपिंग यंत्रणेत सुधारणा तसेच नियंत्रण प्रणाली अधिक सक्षम करण्यात येत आहे. या सौरऊर्जेवर आधारित या प्रकल्पामुळे पाणीपुरवठा योजनेचा वार्षिक खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, बचतीतून देखभाल व दुरुस्ती कामांसाठी अधिक निधी उपलब्ध होईल. तसेच वीजपुरवठ्यातील खंडितता किंवा वाढत्या दरांचा परिणाम योजनेवर कमी प्रमाणात होणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक विश्वासार्ह व नियमित पाणीपुरवठा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments

No comments yet.