रक्ताच्या थारोळ्यातही सोडले नाही स्टिअरिंग... चाळीसगावच्या पुत्राचे शौर्य पाहून सारेच थक्क... सरकारने केली एवढ्या लाखांची मदत... 

Share:
Main Image
Last updated: 10-Apr-2026

जळगाव, (प्रतिनिधी) १० एप्रिल - उग्रवाद्यांच्या अंदाधुंद गोळीबारात गंभीर जखमी होऊनही जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणारे चाळीसगावचे सुपुत्र व सीआरपीएफ जवान जावेद अहमद यांचा राज्य शासनाच्या वतीने यथोचित गौरव करण्यात आला. 'महाराष्ट्र गौरव पुरस्कार' योजनेअंतर्गत ६० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात प्रदान करण्यात आला. "जावेद अहमद यांच्यासारखे जवान ही राष्ट्राची खरी शक्ती असून, त्यांचे शौर्य तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे," असे गौरवद्गार पालकमंत्र्यांनी यावेळी काढले.

थरारक प्रसंग : रक्ताच्या थारोळ्यातही सोडले नाही 'स्टिअरिंग'
मूळचे चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथील रहिवासी असलेले जावेद अहमद १७९ सीआरपीएफ बटालियनमध्ये जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे कार्यरत होते. १८ एप्रिल २०२० रोजी सोपोर परिसरात साहित्य घेऊन जात असताना उग्रवाद्यांनी त्यांच्या वाहनावर दबा धरून हल्ला केला. गोळीबारात डाव्या हाताला गंभीर दुखापत होऊनही जावेद यांनी अदम्य साहस दाखवत वाहन सुरक्षित स्थळी नेले. या हल्ल्यात त्यांना ७४ टक्के अपंगत्व आले, मात्र देशाप्रती असलेली निष्ठा तसूभरही कमी झाली नाही. आजही ते पुणे येथे कर्तव्यावर तैनात आहेत.

Advertisement

शासनाकडून शौर्याची दखल
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ३१ मार्च २०२६ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार, सुरक्षा मोहिमांमध्ये जखमी झालेल्या जवानांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्याअंतर्गत जावेद अहमद यांच्या शौर्याचा सन्मान करण्यात आला.

"जवानांच्या त्यागामुळेच देश सुरक्षित आहे. कठीण परिस्थितीतही कर्तव्य पार पाडणे हीच खरी देशभक्ती असून, अशा शूर जवानांच्या पाठीशी शासन सदैव खंबीरपणे उभे राहील."
— गुलाबराव पाटील, पालकमंत्री

प्रशासकीय उपस्थिती
या सोहळ्याला जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, जिल्हा सैनिक अधिकारी निलेश पाटील, सहाय्यक जिल्हा सैनिक अधिकारी संजय गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ उगले यांनी केले.

Comments

No comments yet.