मुंबई, (विशेष प्रतिनिधी) १० एप्रिल - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचे प्रकरण आता केवळ तांत्रिक बिघाडापुरते मर्यादित राहिले नसून, त्यामागे एक मोठे राजकीय आणि आर्थिक गूढ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दिल्लीत नुकत्याच झालेल्या एका हाय-प्रोफाईल लग्नाच्या रिसेप्शननंतर घडलेल्या घडामोडींनी या संशयाला अधिक बळ दिले असून, विमान कंपनीचा मालक व्ही. के. सिंग आणि महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याच्या संबंधांवरून आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दिल्लीतील 'त्या' भेटीने भुवया उंचावल्या
नुकतेच दिल्लीत ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा यांच्या मुलीचे लग्न पार पडले. या सोहळ्याला महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रभावशाली नेता उपस्थित होता. विशेष म्हणजे, हे नेते परतताना 'व्हीएसआर' (VSR) च्या विमानाने मुंबईत आले. खाजगी चार्टर टर्मिनलवर खुद्द व्ही. के. सिंग या नेत्याने त्यांचे स्वागत केले. यावेळी दोघांमध्ये झालेले हस्तांदोलन आणि सिंग याने त्या नेत्याच्या पीएच्या हातात सोपवलेली काही कागदपत्रे, यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
मृताच्या मुलाकडेच विमानाचे सारथ्य?
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अजित पवार यांच्या विमान अपघातात ज्या पायलट कपूर यांचा मृत्यू झाला, त्यांचा मुलगाच या बड्या नेत्याच्या विमानाचा पायलट होता. हा केवळ योगायोग आहे की यामागे काही नियोजित साखळी आहे? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर 'व्हीएसआर' कंपनीवर इतका आंधळा विश्वास ठेवणे भविष्यात धोक्याचे ठरू शकते, असा इशाराही जाणकारांकडून दिला जात आहे.
मध्यस्थ की दलाल? व्ही. के. सिंगचा नवा चेहरा
व्ही. के. सिंग याचे धागेदोरे आता केवळ विमानसेवेपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. आंध्र प्रदेशातील बड्या नेत्यांशी आर्थिक हितसंबंध जपून तेथील मोठ्या प्रकल्पांमध्ये 'मध्यस्थ' किंवा 'दलाल' म्हणून काम करण्याचा सिंगचा अनुभव आहे. आता तोच पॅटर्न महाराष्ट्रातही राबवला जात असल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रातील बड्या प्रकल्पांच्या कामात सिंग मध्यस्थी करत असेल, तर हे सरकार नेमके कोणाच्या फायद्यासाठी काम करत आहे? असा जळजळीत प्रश्न विचारला जात आहे.
सीबीआय चौकशीची मागणी
एकीकडे इतके गंभीर आरोप होत असताना सत्ताधारी पक्ष मात्र अजूनही एएआयबी (AAIB) च्या अहवालाची प्रतीक्षा करत शांत बसला आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि अपघाताची मालिका पाहता, केवळ तांत्रिक चौकशी पुरेशी नसून सीबीआय (CBI) मार्फत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.