बोटे गमावलेल्या कामगाराला उद्योजकाची लाथाबुक्क्यांनी मारहाण... अंबडमधील संतापजनक प्रकार...

Share:
Main Image
Last updated: 10-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १० एप्रिल - अंबड औद्योगिक वसाहतीत एका कारखान्यात अपघातात जखमी झालेल्या कामगाराने नुकसान भरपाईची मागणी केली असता, कारखाना मालकाने त्याला बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. "पुन्हा कंपनीत पाय ठेवला तर जीवे ठार मारू", अशी धमकीही यावेळी देण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला असून, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवन आधार सुतार (२४, रा. माताजी चौक, विजयनगर, सिडको) हे अंबड येथील 'लक्ष्मी इंजिनिअरिंग प्रा. लि.' या कंपनीत कार्यरत होते. गेल्या सप्टेंबर महिन्यात काम करत असताना व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे प्रेस मशीनमध्ये त्यांचा हात अडकला होता. या भीषण अपघातात पवन यांच्या हाताची तीन बोटे निखळली होती. उपचारानंतर व्यवस्थापनाने त्यांना पुन्हा कामावर घेतले, मात्र काही दिवसातच त्यांना तडकाफडकी कामावरून काढून टाकण्यात आले.

Advertisement

भरपाईऐवजी मिळाली मारहाण
अपघातात कायमस्वरूपी अपंगत्व आल्याने पवन यांनी १९ जानेवारी रोजी कंपनीचे मालक शिवेंद्र शिवराम सिंग यांची भेट घेतली. त्यांनी आपल्या झालेल्या नुकसानीची भरपाई मागितली असता, मालक शिवेंद्र सिंग यांचा संयम सुटला. त्यांनी पवन यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच, पुन्हा कंपनीच्या परिसरात दिसल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

पोलिसात गुन्हा दाखल
आपल्या हक्काची मागणी करताना झालेल्या या अन्यायाविरोधात पवन सुतार यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी शिवेंद्र शिवराम सिंग यांच्याविरोधात मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेवाळे करत आहेत. औद्योगिक वसाहतीत कामगारांच्या सुरक्षेचा आणि त्यांच्या हक्कांचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Comments

No comments yet.