शिर्डी, (प्रतिनिधी) ९ एप्रिल - उन्हाची वाढती तीव्रता व लाभक्षेत्रात पिण्याच्या पाण्याची निर्माण झालेली टंचाई विचारात घेऊन, भंडारदरा धरणातून बिगरसिंचनाचे आवर्तन तातडीने सुरू करण्याच्या सूचना जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या संगमनेर, राहाता व श्रीरामपूर तालुक्यांतील बहुतांश गावांत पाण्याची टंचाई भासू लागली आहे. गावपातळीवरील पाण्याचे स्रोत कमी पडल्याने तसेच नदीकाठच्या गावांत पाण्याची पातळी खालावल्याने ग्रामपंचायतींसह नगरपरिषदांच्या कार्यक्षेत्रातही पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे.
नागरिकांची गरज लक्षात घेऊन धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करावे. आवर्तन सुरू करताना शेवटच्या गावापर्यंत पाणी मिळेल, याची दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी. तसेच पाण्याचा अपव्यय होणार नाही, यासाठी योग्य ती काळजी घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या बिगरसिंचन आवर्तनाचा लाभ संगमनेर, राहाता व श्रीरामपूर तालुक्यांतील ग्रामपंचायतींसह शहरी भागांतील नागरिकांना होणार आहे.