छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) ८ एप्रिल - अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील हायव्होल्टेज लढतीनंतर आता न्यायालयीन लढाईतही खासदार नीलेश लंके यांनी बाजी मारली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील लंके यांच्या विजयाला आव्हान देणारी भाजपचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांची निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने बुधवारी (८ एप्रिल) फेटाळून लावली. या निकालामुळे नीलेश लंके यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांचा खासदारकीचा मार्ग आता पूर्णपणे निष्कंटक झाला आहे.
काय होते प्रकरण?
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नीलेश लंके यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांचा पराभव केला होता. मात्र, या निवडणुकीत लंके यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी गैरमार्गांचा अवलंब केला आणि निवडणूक नियमांचे उल्लंघन केले, असा आरोप करत सुजय विखे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. लंके यांची निवड रद्द करावी, अशी मागणी विखे यांनी याचिकेद्वारे केली होती.
प्रदीर्घ सुनावणीनंतर निकाल
गेल्या अनेक महिन्यांपासून ही याचिका खंडपीठात प्रलंबित होती. राज्यात इतर ठिकाणी दाखल झालेल्या अनेक निवडणूक याचिका यापूर्वीच फेटाळण्यात आल्या होत्या, मात्र नगरची ही याचिका चर्चेचा विषय ठरली होती. बुधवारी न्यायमूर्ती किशोर संत यांच्यासमोर या प्रकरणाची अंतिम सुनावणी झाली.
दोन्ही बाजूंचा सविस्तर युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने डॉ. विखे यांचे दावे फेटाळून लावत नीलेश लंके यांचा विजय वैध ठरवला.
राजकीय वर्तुळात चर्चा
विखे-पाटील आणि लंके यांच्यातील राजकीय वैर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. निवडणुकीच्या मैदानात पराभव स्वीकारल्यानंतर विखे यांनी कायदेशीर लढा दिला होता, परंतु तेथेही त्यांना यश आले नाही. या निकालामुळे लंके समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, दक्षिण नगरच्या राजकीय संघर्षाला आता पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे.