नाशिक, (प्रतिनिधी) ८ एप्रिल - नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील शिवाजीनगर परिसरात कार अपघातात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या ९ जणांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. प्रत्येक कुटुंबास ५ लाख रुपये याप्रमाणे एकूण ४५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख डॉ. चैतन्य बैरागी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.
या दुर्घटनेत दिंडोरी तालुक्यातील इंदोरे येथील सुनील दत्तू दरगोडे (वय ३५), रेश्मा सुनील दरगोडे (वय ३३), आर्या अनिल दरगोडे (वय ३५), मृदुल अनिल दरगोडे (वय १५), श्रेयस अनिल दरगोडे (वय १२), श्रद्धा अनिल दरगोडे (वय १०), श्रावणी अनिल दरगोडे (वय ११), गुणवती सुनील दरगोडे (वय ९) आणि आयुषी नरेश दरगोडे (वय १३) यांचा समावेश आहे.
सदर मदतीची रक्कम तहसीलदार, दिंडोरी यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया, दिंडोरी शाखेतील खात्यात वर्ग करण्यात येणार असून संबंधित कुटुंबीयांच्या बँक खात्यात ती जमा करण्याबाबत बँकेस निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्हा प्रशासनाने या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.
गरजू नागरिकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीबाबत अधिक माहितीसाठी टोल-फ्री क्रमांक १८०० १२३ २२११ वर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.