दिंडोरी, (प्रतिनिधी) ७ एप्रिल - दिंडोरी तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. तीन दिवसांपूर्वीच इंदोरे येथील ९ जणांचा कार विहिरीत कोसळून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, आज पुन्हा तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये ५ शालेय विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या लागोपाठच्या घटनांमुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे.
कादवा नदीत पोहताना काळ आला
पहिली दुर्दैवी घटना परमोरी येथे घडली. वरखेडा येथील जनता विद्यालयात शिकणारे समीर रावसाहेब गांगोडे (१४) आणि यश राहुल पगारे (१२) हे दोन विद्यार्थी कादवा नदीत पोहण्यासाठी गेले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. त्यांच्यासोबत असलेला तिसरा विद्यार्थी सुदैवाने बचावला आहे. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
धार्मिक कार्यक्रमासाठी गेले अन् आयुष्यच संपले
दुसरी घटना निफाड तालुक्यातील खेरवाडी येथे घडली. दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील रुद्र गणेश जाधव (१३) आणि ओमकार सुनील फटांगळे (१३) हे दोन विद्यार्थी एका धार्मिक कार्यक्रमासाठी खेरवाडी येथे गेले होते. दुपारी २ वाजेच्या सुमारास गागरा ओहळात अंघोळीसाठी उतरले असता दोघांचाही बुडून मृत्यू झाला. हे दोघेही मोहाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी होते. या घटनेची नोंद सायखेडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

साडीचा फास लागून मृत्यू
तालुक्यात पुन्हा एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कादवा म्हाळुंगी येथे मंगळवारी (दि. ७ एप्रिल) दुपारी सुमारे साडे अकराच्या सुमारास झाडाला झोका बांधत असताना तोल जाऊन पडल्याने झोक्याच्या साडीचा गळफास बसून सुरज हिम्मत गायकवाड (वय १३) या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख व भरत कनोज पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, आजच दिंडोरी तालुक्यात वेगवेगळ्या अपघातांमध्ये एकूण पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण तालुका हादरला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी शुक्रवारी रात्री दिंडोरी येथे कार विहिरीत कोसळून सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे परिसरात भीती व शोककळा पसरली आहे
तीन दिवसांत १३ चिमुकल्यांचा अंत
दिंडोरी तालुक्यात गेल्या ७२ तासांत जलसमाधी मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आता १० वर पोहोचली आहे.
प्रशासनाचे आवाहन: पालकांनी सतर्क राहावे
तालुक्यात एकापाठोपाठ एक घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण आहे. प्रशासनाने यावर गंभीर दखल घेत तात्काळ आवाहन केले आहे की:
मुलांना नदी, नाले, विहिरी आणि इतर जलस्रोतांजवळ एकटे सोडू नका.
पाण्याचा अंदाज नसल्यास पोहण्याचे धाडस करू नका.
शाळा आणि पालकांनी विद्यार्थ्यांमध्ये जलसुरक्षेबाबत जागृती करावी.
"सलग घडणाऱ्या या घटना अत्यंत क्लेशदायक आहेत. मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालकांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.