नाशिकच्या रिक्षाचालकांचा कौतुकास्पद निर्णय... लिंबू-मिरचीला कायमचा रामराम..

Share:
Main Image
Last updated: 07-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ७ एप्रिल -  अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी केवळ प्रबोधन पुरेसे नसते, तर त्याला कृतीची जोड लागते. याचाच प्रत्यय नाशिकमध्ये आला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) राज्य परिषदेतून प्रेरणा घेत, नाशिकच्या रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षांना बांधलेली लिंबू-मिरची आणि काळ्या बाहुल्या तोडून फेकून दिल्या. "आता लिंबू-मिरची नाही, तर वाहतुकीचे नियमच आमचे रक्षण करतील," असा निर्धार या चालकांनी व्यक्त केला आहे.

'विवेकाशी नाते जोडले'
नाशिकमधील सिटू भवन परिसरात नुकतीच अंनिसच्या वतीने 'फलज्योतिष व बुवाबाजी विरोधी संघर्ष राज्य परिषद' पार पडली. भाड्याच्या प्रतीक्षेत असलेल्या काही रिक्षाचालकांनी कुतूहल म्हणून या परिषदेत हजेरी लावली. तेथे लावण्यात आलेले ‘लिंबू-मिरची तोडा, मंत्र-तंत्र सोडा, विवेकाशी नाते जोडा’ हे घोषवाक्य त्यांच्या मनावर बिंबले गेले. या विचाराने प्रेरित होऊन चांडक सर्कल येथील रिक्षाचालकांनी एकत्र येत स्वतःहून अंधश्रद्धेचा त्याग करण्याचा निर्णय घेतला.

Advertisement

खाण्याचे पदार्थ रिक्षेला का?
यावेळी रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षेला बांधलेले लिंबू, मिरची आणि दृष्ट लागू नये म्हणून लावलेल्या काळ्या बाहुल्या काढून टाकल्या. "लिंबू आणि मिरची हे खाण्याचे पदार्थ आहेत, त्यांचा नशिबाशी किंवा अपघाताशी कोणताही संबंध नाही. ही एक कालबाह्य झालेली प्रथा असून ती अवैज्ञानिक आहे," असे मत चालकांनी मांडले. तसेच, यापुढे कधीही असे तोडगे करणार नाही, अशी शपथही त्यांनी घेतली.

"अपघात टाळण्यासाठी लिंबू-मिरचीची नाही, तर वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याची गरज आहे, हे आम्हाला अंनिसच्या कार्यक्रमामुळे पटले आहे. आता आम्ही इतरही सहकाऱ्यांना या अंधश्रद्धेपासून दूर राहण्याचे आवाहन करणार आहोत."
— शरद भामरे, रिक्षाचालक

यांचा होता सहभाग
या विधायक उपक्रमात रिक्षाचालक शरद भामरे, दिलीप देवरे, गणपत सोनवणे, विलास भेलके, प्रदीप सोरे, श्रीराम कुर्दळ, सिंटू मंडल यांच्यासह अन्य चालक सहभागी झाले होते. या प्रसंगी महाराष्ट्र अंनिस नाशिकचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रिक्षाचालकांनी घेतलेल्या या धाडसी निर्णयाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.

Advertisement

Comments

No comments yet.