अजित पवारांच्या अपघाताचे भोंदू खरात कनेक्शन?  यामुळे तुमचा संशयही होईल बळकट...

Share:
Main Image
Last updated: 06-Apr-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ६ एप्रिल - राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात आता एक नवीन आणि धक्कादायक वळण समोर आले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदू बाबा अशोक खरात याच्या आर्थिक व्यवहारांबाबत केलेल्या गौप्यस्फोटानंतर, आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणाचे तार थेट अजितदादांच्या अपघाताशी जोडले आहेत. या अपघातामागे घातपाताचा संशय व्यक्त करत, सीआयडीने अशोक खरात आणि त्याच्याशी संबंधित लोकांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

काय आहेत रोहित पवारांचे आरोप?
रोहित पवार यांनी म्हटले आहे की, अंजली दमानिया यांनी दिलेली माहिती अत्यंत गंभीर आहे. अजितदादांच्या अपघाताच्या एक दिवस आधी, अपघाताच्या दिवशी आणि त्यानंतरच्या दिवशी 'समता पतसंस्थे'त अशोक खरातचे मोठे आर्थिक व्यवहार झाले आहेत. या व्यवहारांचा टायमिंग आणि अपघाताची वेळ यामध्ये साधर्म्य असल्याने संशय बळावला आहे.

Advertisement

विमान प्रवास आणि जादूटोणा
यापूर्वी अजितदादांच्या घराबाहेर जादूटोणा झाल्याचे प्रकार समोर आले होते. त्यातच आता भोंदू खरात याने 'व्हीएसआर' (VSR) कंपनीच्या विमानांमधून अनेकदा प्रवास केल्याची माहिती समोर येत आहे. खरातचे अनुयायी आणि त्याची एकूण कार्यपद्धती पाहता, अजितदादांच्या अपघाताशी त्याचा काही संबंध आहे का? याची चौकशी होणे गरजेचे आहे, असे पवार यांनी नमूद केले.

सीआयडी चौकशीची मागणी
अजित पवारांच्या अपघाताचा तपास सध्या सीआयडीमार्फत सुरू आहे. "केवळ अपघाताची तांत्रिक चौकशी करून चालणार नाही, तर खरातचे आर्थिक व्यवहार, त्याचे राजकीय धागेदोरे आणि घातपाताचा कोन या दृष्टीने सीआयडीने तपास यंत्रणा हलवायला हव्या," असे आवाहन रोहित पवार यांनी केले आहे.

अंजली दमानिया यांच्या दाव्यानंतर आता रोहित पवारांनी थेट घातपाताचा संशय व्यक्त केल्याने या प्रकरणाला आता राजकीय आणि गुन्हेगारी अशा दोन्ही स्तरावर मोठी धार प्राप्त झाली आहे.

Comments

No comments yet.