जिल्ह्यातील अवकाळी नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करा.... मंत्री छगन भुजबळ यांचे निर्देश

Share:
Main Image
Last updated: 05-Apr-2026

नाशिक/येवला, (प्रतिनिधी) ५ एप्रिल - नाशिक जिल्ह्यासह येवला तालुक्यात २ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू, द्राक्ष, कांदा, मका यासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी प्रशासनाला जलद पंचनामे करून अहवाल शासनास देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्री भुजबळ यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधित यंत्रणांना त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून अनेक ठिकाणी उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. द्राक्षबागा, कांदा, मका तसेच काढणीस आलेल्या गव्हाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. या परिस्थितीत प्रशासनाने विलंब न करता प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे करून अहवाल शासनाकडे सादर करावा, असे स्पष्ट निर्देश मंत्री भुजबळ यांनी दिले.

Advertisement

तसेच, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या निकषांनुसार तातडीने मदत मिळावी यासाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले. शेतकऱ्यांना दिलासा देणे हे शासनाचे प्राधान्य असून कोणत्याही प्रकारची दिरंगाई सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला.

दरम्यान, स्थानिक प्रशासनानेही नुकसानीचे प्राथमिक सर्वेक्षण सुरू केले असून लवकरात लवकर संपूर्ण अहवाल सादर करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. शेतकऱ्यांनीही आपल्या नुकसानीची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देऊन पंचनामे प्रक्रियेत सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

No comments yet.