नाशिक, (प्रतिनिधी) ५ एप्रिल - आगामी नाशिक कुंभमेळा २०२७ हा केवळ धार्मिक पर्व नसून आस्था, विकास, स्वच्छता, सुशासन आणि सांस्कृतिक अभिमानाचा भव्य संगम असणार आहे. हे कुंभ पर्व साधू संतांच्या मार्गदर्शनातून जगासाठी आदर्श ठरेल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. नाशिक शहरातील स्वामी नारायण मंदिर येथे आयोजित अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय परिषद बैठकीत ते बोलत होते.
यावेळी मंत्री दादाजी भुसे, माजी खासदार हेमंत गोडसे, महंत स्वामी सुब्रह्मण्यम भारती, महंत राजेंद्र दास, महंत रवींद्र पुरी, महंत प्रसाद महाराज अमळनेरकर, विश्व हिंदू परिषदेचे दिनेश चंद्रा,आयडीएसएचे अभ्यासक आशिष शुक्ल, उपमहापौर विलास शिंदे, नगरसेवक कैलास मुदलियार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्यासह देशभरातून आलेले पूज्य संत, महंत, आचार्य, धर्माचार्य, अधिकारी, पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मंत्री भुजबळ म्हणाले की, संत महंत हाच कुंभमेळ्याचा आत्मा आहे. आगामी नाशिक कुंभमेळा नियोजनात संतांची भूमिका मार्गदर्शक आणि निर्णायक असणार आहे. नाशिक ही केवळ ऐतिहासिक नगरी नसून भारताच्या आध्यात्मिक चेतनेचे, सनातन परंपरेचे आणि संत संस्कृतीचे जिवंत केंद्र आहे. गोदावरीच्या पावन तीरावर वसलेले नाशिक, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची दिव्यता, रामायणकालीन परंपरा आणि संत परंपरेच्या वारशामुळे देशभरातील भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र बनले असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, कुंभमेळ्याचे वैभव केवळ त्याच्या भव्यतेत नसून, त्याच्या आध्यात्मिक गाभ्यात आहे आणि त्या गाभ्याचे केंद्र म्हणजे संत महंत आहे. अखाडे, शाही स्नान, धर्मसभा, प्रवचन, साधना आणि तपश्चर्या यांमधूनच कुंभाला त्याचे खरे स्वरूप प्राप्त होते. त्यामुळे आगामी कुंभाच्या प्रत्येक नियोजनात संत महंत त्यांचे प्रतिनिधी, अखाडे आणि धर्माचार्य यांचा सन्मानपूर्वक सहभाग महत्वाचा असणार आहे. या कुंभ पर्वाकडे केवळ धार्मिक आयोजन म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही. हा सोहळा नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठीचा महत्वाचा आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने उभारल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा रस्ते, पूल, घाट, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, आरोग्य सुविधा, साधुग्राम, पार्किंग, निवासव्यवस्था, सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापनया केवळ या कुंभमेळ्यापुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर त्या पुढील अनेक दशकांसाठी शहराच्या विकासाचा पाया राहतील असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, शासनाने याच दृष्टीने व्यापक नियोजन सुरू केले असून, या कुंभमेळ्यासाठी सुमारे २८ हजार कोटींची विकासकामे प्रस्तावित व कार्यान्वित केली आहेत. यामध्ये विशेषतः गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी प्राधान्य असणार आहे. तसेच शहर जिल्ह्यातील प्रमुख रस्ते व पुलांचे सुदृढीकरण, नवीन घाटांची उभारणी, जुन्या घाटांचे आधुनिकीकरण, पेयजल व स्वच्छता व्यवस्थेचा विस्तार, साधुग्रामची उभारणी, पार्किंग, निवास, आरोग्य सुविधा, आपत्कालीन सेवा आणि गर्दी व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांचा समावेश आहे. नाशिक कुंभ केवळ भव्य नव्हे, तर व्यवस्थित, सुरक्षित, सुगम आणि दूरदर्शी व्हावा, हा शासनाचा उद्देश आहे असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, कुंभसारख्या विराट आयोजनाचे यश केवळ निधी किंवा प्रकल्पांवर अवलंबून नसते. तर विश्वास, संवाद आणि समन्वय हीच त्याची खरी ताकद असते. शासन, प्रशासन, पोलीस, आरोग्य विभाग, आपत्ती व्यवस्थापन, स्थानिक संस्था, स्वयंसेवी संघटना, व्यापारी वर्ग आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संत महंत या सर्व घटकांनी एकत्रितपणे काम केल्यासच कुंभ यशस्वी होईल. या कुंभमेळ्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था, रोजगार आणि सामाजिक उन्नतीला मोठी चालना मिळणार आहे. पूज्य संतांच्या मार्गदर्शनातून, शासन-प्रशासनाच्या कटिबद्धतेतून आणि समाजाच्या सक्रिय सहभागातून नाशिक कुंभमेळा जगासाठी एक आदर्श, प्रेरणादायी आणि ऐतिहासिक आयोजन ठरेल असा विश्वास देखील मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.