नाशिक, (प्रतिनिधी) ५ एप्रिल - नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या पार्श्वभूमीवर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज सिन्नर तालुक्यातील बाधित भागांची प्रत्यक्ष पाहणी केली.
मंत्री महाजन यांनी चिंचोली तसेच वडगाव पिंगळा या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची माहिती घेतली. चिंचोली येथे शेतकरी रमेश नागरे यांच्या कांदा पिकाची तसेच आनंदीबाई काशिनाथ कांगणे यांच्या बीट व कांदा पिकाची पाहणी केली. तर वडगाव पिंगळा येथे विठ्ठल सांगळे आणि कचरू गंधास यांच्या नुकसानग्रस्त शेती पीकांचीही त्यांनी पाहणी केली.
यावेळी मंत्री महाजन यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून नुकसानीचा सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी शासन स्तरावर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. त्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे,” असे आश्वासनही मंत्री महाजन यांनी यावेळी दिले.
यावेळी गारपीटीमुळे कांदा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी मंत्री महाजन यांच्याकडे केली.
या पाहणी दौऱ्यात महापौर हिमगौरी आडके, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय सानप, उदय सांगळे यांच्यासह महसूल, कृषी व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी - जयकुमार रावल
धुळे - राज्य शासन शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी असून अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले. पालकमंत्री रावल यांनी आज शिंदखेडा तालुक्यातील टेमलाय, मेथी व धुळे तालुक्यातील लामकानी आदी गावांना भेट देऊन अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या शेती नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या पाहणी दौऱ्यात आमदार राघवेंद्र पाटील,दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुरज जगताप, तहसीलदार अरुण शेवाळे, तालुका कृषि अधिकारी मनोज सिसोदिया, योगेश सोनवणे, गट विकास अधिकारी सुरेश नेतनराव,मंडळ कृषि अधिकारी बी. के. बोरसे तसेच महसूल व कृषि विभागाचे अधिकारी तसेच शेतकरी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. रावल म्हणाले की, जिल्हृयात अवकाळी पाऊस,गारपिट व वादळी पाऊसामुळे विविध पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे कोणीही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. यासाठी पंचनामे पारदर्शक व अचुक पद्धतीने करण्यात यावेत. ज्या शेतकऱ्यांचे पिकांचे, फळबागांचे तसेच शेतीमालाचे नुकसान झाले आहे, अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तात्काळ पूर्ण करून तातडीने शासनाकडे अहवाल सादर करण्याच्या सूचना महसूल व कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
पालकमंत्री रावल यांनी शेतकऱ्यांना धीर देतांना म्हटले की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडे पाठपुरवा करण्यात येईल. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असुन शासनाच्या नियमांनुसार शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यात येईल असे सांगितले. तसेच वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहे. पालकमंत्री श्री.रावल यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी काही शेतकऱ्यांनी शेतीच्या नुकसानीबाबत समस्या मांडल्या, त्यावर संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री रावल यांनी दिल्या.