मुंबई, (प्रतिनिधी) ५ एप्रिल - भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यात वाकयुद्ध रंगात आले आहे. अंधारे यांनी दमानिया यांना अत्यंत टोकदार प्रश्न विचारत, त्यांची सत्ताधाऱ्यांशी असलेली जवळीक आणि त्यांच्या लढ्यातील 'निवडकपणा' (Selectivity) यावर जोरदार निशाणा साधला आहे.
एसआयटीपेक्षाही वेगवान माहिती येते कुठून?
अशोक खरात प्रकरणात दमानिया यांनी केलेल्या गौप्यस्फोटांनंतर अंधारे यांनी विचारले की, "एसआयटी (SIT) पेक्षाही वेगाने तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणारा तो 'खास' माणूस कोण? कालच्या कॉल डिटेल्ससह माहिती जर तुमच्याकडे इतक्या तत्परतेने येत असेल, तर सरकारने तेजस्विनी सातपुते यांच्याऐवजी तुम्हालाच एसआयटीचे प्रमुख करायला हवे," असा टोला अंधारे यांनी लगावला. तसेच, कॉल रेकॉर्ड्स आणि ड्युरेशनची माहिती देणारे असे कोणते अॅप आहे, हे आम्हालाही सांगा, अशी विचारणा त्यांनी केली.
निशाण्यावर केवळ 'नॉन-सीएम' लॉबीच का?
दमानिया यांनी घेतलेल्या नावांवर आक्षेप घेत अंधारे म्हणाल्या की, तुमच्याकडे आलेल्या नावांमध्ये केवळ आशिष शेलार आणि चंद्रकांत पाटील यांचीच नावे कशी काय येतात? मुख्यमंत्री लॉबीतील एकही नाव तुमच्या यादीत कसे नाही, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. "बात निकलेगी तो दूर तलक जायेगी," असे म्हणत अंधारे यांनी दमानियांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
अंधारे यांनी उपस्थित केलेले मुख्य मुद्दे:
निवडक लढा: कोरेगाव पार्कच्या विषयात लढणाऱ्या दमानिया जैन बोर्डिंगच्या प्रकरणात गप्प का होत्या?
फोटोवर मौन का?: अशोक खरातसोबत अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचे फोटो समोर आले, त्यावर अद्याप भाष्य का केले नाही?
जुन्या नोंदींकडे दुर्लक्ष: २०१२ चा बंदूक परवाना आणि २०२२ मध्ये फडणवीस काळात झालेले त्याचे नूतनीकरण, तसेच जयकुमार रावल यांच्या काळातील तीर्थक्षेत्राचा दर्जा या बाबी
दमानिया मुद्दाम लपवत असल्याचा आरोप.
"सत्ताधाऱ्यांशी असलेली तुमची जवळीक आता लपून राहिलेली नाही, 'ये पब्लिक है सब जानती है'..." अशा शब्दांत अंधारे यांनी दमानिया यांच्यावर फेसबुक पोस्टच्या माध्यमातून प्रहार केला आहे. या आरोप-प्रत्यारोपामुळे आता खरात प्रकरणाला वेगळेच राजकीय वळण लागल्याचे चित्र दिसत आहे.
?s=20