भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा संताप...

Share:
Main Image
Last updated: 04-Apr-2026

मुंबई (प्रतिनिधी) ०४ एप्रिल -  नाशिकमधील स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात याच्याकडून महिलांचे होणारे लैंगिक शोषण आणि फसवणुकीचे प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणावर आता सिनेसृष्टीतूनही तीव्र पडसाद उमटत असून, प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने सोशल मीडियाद्वारे आपला जळजळीत संताप व्यक्त केला आहे. "आपल्या उंबरठ्यावर पडलेली घाण स्वच्छ करायला नको का?" असा थेट सवाल तिने समाजाला विचारला आहे.
‘माझी ती पवित्र अस्वच्छता आणि दुसऱ्याची ती दुर्गंधी?’
सोनालीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये समाजात घर करून बसलेल्या दांभिकतेवर बोट ठेवले आहे. तिने म्हटले आहे की, "आता तरी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजून घेऊया. महिलांवर घृणास्पद अत्याचार, लैंगिक व्याभिचार, आर्थिक फसवणूक आणि भावनिक शोषण... हे सर्व अत्यंत संतापजनक आहे. केवढी ही पिळवणूक!"
अंधश्रद्धेच्या मुद्द्यावर बोलताना धर्माचा आधार घेणाऱ्यांनाही तिने

Advertisement
खडे बोल सुनावले आहेत. तिने विचारले आहे की, "अजूनही आपण म्हणणार का की आमच्याच धर्मातली अंधश्रद्धा का दिसते? माझी ती पवित्र अस्वच्छता आणि दुसऱ्याची ती दुर्गंधी, असे आपण म्हणणार आहोत का?"
जागे होण्याची वेळ आली आहे!
महाराष्ट्रात आपल्या आसपास अशा प्रकारच्या घटना घडत असून सामान्य जनता ठगली जात असल्याचे दुःख तिने व्यक्त केले. "आपण ठगले जातोय.. जागे होऊया," असे कळकळीचे आवाहन करत तिने ही पोस्ट केली आहे. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया दिल्या असून, भोंदूगिरीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
काय आहे प्रकरण?
नाशिकमध्ये अशोक खरात नावाच्या भोंदू बाबाने दैवी शक्तीचा बहाणा करून अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आणि त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. मात्र, या घटनेमुळे महाराष्ट्रातील वारकरी आणि पुरोगामी विचारांच्या चळवळीत संतापाची लाट आहे.

Comments

No comments yet.