मुंबई, (प्रतिनिधी) ३ एप्रिल - भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. हे प्रकरण केवळ गुन्हेगारीपुरते मर्यादित नसून, खरातचे लागेबांधे थेट मंत्रालय आणि दिग्गज नेत्यांपर्यंत पोहोचल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. खरातच्या 'कॉल डिटेल रेकॉर्ड'चा (CDR) हवाला देत दमानिया यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची नावे उघड केली आहेत.
नेत्यांशी संभाषणाचा 'आकडा' थक्क करणारा
दमानिया यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार, अशोक खरात आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांमध्ये शेकडो वेळा संवाद झाला आहे. यात प्रामुख्याने खालील नावांचा समावेश आहे:
नेता/व्यक्ती कॉल्सची संख्या संभाषणाचा तपशील
रूपाली चाकणकर १७७ कॉल्स एकूण ३३,७२७ सेकंद संभाषण
प्रतिभा चाकणकर (बहीण) २३६ कॉल्स खरातसोबत सातत्याने संपर्क
एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री) १७ कॉल्स १० इनकमिंग, ७ आऊटगोईंग (एक कॉल २१ मिनिटे)
दीपक लोंढे (केसरकरांचे निकटवर्तीय) १८९ कॉल्स एकूण ३९,५८९ सेकंद संभाषण
चंद्रकांत पाटील ०८ कॉल्स भाजप नेते
सुनील तटकरे ०८ कॉल्स राष्ट्रवादी नेते
आशिष शेलार ०१ कॉल भाजप नेते
"उपमुख्यमंत्र्यांनी जनतेला उत्तर द्यावे!"
अंजली दमानिया यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. "एखाद्या भोंदू बाबाला राज्याचे उपमुख्यमंत्री १७ वेळा कॉल का करतात? त्यांच्यात २१ मिनिटे काय चर्चा झाली, हे जनतेला समजायला हवे," असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, रूपाली चाकणकर यांचे खरातशी इतक्या मोठ्या प्रमाणावर संभाषण का झाले, याची चौकशी करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणीही दमानिया यांनी केली आहे.
"हे केवळ सामान्य कॉल्सचे रेकॉर्ड आहेत. व्हॉट्सअॅप कॉल्सची संख्या तपासली तर हे आकडे कितीतरी पटीने जास्त असू शकतात."
— अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या
आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि SIT कडे धाव
अशोक खरातला केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर कतार, युएई आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांतूनही मोठ्या प्रमाणावर फोन आले असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची व्याप्ती पाहता, दमानिया यांनी ही सर्व माहिती मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक (DGP) आणि एसआयटी (SIT) प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याकडे सुपूर्द केली आहे. विशेष म्हणजे, ही माहिती त्यांना एका अज्ञात व्यक्तीकडून मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राजकीय वर्तुळात खळबळ
या गौप्यस्फोटामुळे सत्ताधारी पक्षात मोठी अस्वस्थता पसरली आहे. एका भोंदू बाबाचे मंत्रालयातील बड्या नेत्यांशी असलेले हे 'कनेक्शन' नेमके कशासाठी होते? यामध्ये काही आर्थिक व्यवहार किंवा राजकीय आश्रय होता का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. एसआयटी आता या सीडीआर रिपोर्टची कशा प्रकारे चौकशी करते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.