नाशिक, (प्रतिनिधी) २ एप्रिल - सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम स्टेटस ठेवल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना अमृतधाम भागात घडली आहे. या हल्ल्यात मुलाच्या डोक्यात वजनी शस्त्राने वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला असून, पंचवटी पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य शेजवळ व त्याच्या तीन मित्रांविरुद्ध याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राहुल बबलू जाधव (वय १७, रा. लक्ष्मणनगर, अमृतधाम) याने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल जाधव आणि त्याचा मित्र सुरज कांबळे हे दोघे बुधवारी (दि. १) सायंकाळी घरासमोरील कट्यावर गप्पा मारत बसलेले होते.
'भाई' बनतो का? असा विचारला जाब
यावेळी संशयित आदित्य शेजवळ आणि त्याचे साथीदार त्या ठिकाणी आले. राहुलने प्रेम खैरे आणि कार्तिक सोनवणे यांच्यासोबतचे स्टेटस इन्स्टाग्रामवर ठेवल्याचा राग संशयितांच्या मनात होता. "तू या भागात स्टेटस ठेवून भाई बनतो का?" असा जाब विचारत संशयितांनी राहुलला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संशयित आदित्यने हातातील वजनी वस्तूने राहुलच्या डोक्यावर प्रहार केला.
परिसरात घबराट, टोळक्याचा पळ
या हल्ल्यात राहुल रक्ताळलेल्या अवस्थेत खाली कोसळल्यानंतर, "तुला नंतर बघून घेऊ" अशी धमकी देत संशयित टोळक्याने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेमुळे अमृतधाम परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण पसरले होते. जखमी राहुलवर उपचार सुरू असून, पंचवटी पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. पुढील तपास हवालदार भोये करत आहेत.