नाशिक, (प्रतिनिधी) १ एप्रिल - आध्यात्मिक गुरू असल्याचे भासवून महिलांची फसवणूक आणि शोषण करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. दोन आठवड्यांच्या पोलीस कोठडीनंतर, आज नाशिक न्यायालयाने खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या काळ्या कारनाम्यात मुलाचा सहभाग समोर आल्याने पोलिसांनी त्यालाही बेड्या ठोकल्या आहेत.
न्यायालयीन कोठडी आणि कारागृहात रवानगी
गेल्या १४ दिवसांपासून विशेष तपास पथकाच्या (SIT) ताब्यात असलेल्या अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपली. कडक पोलीस बंदोबस्तात त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, प्रकरणाचे गांभीर्य पाहून न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. कारागृहात रवानगी करण्यापूर्वी जिल्हा रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, आता त्याची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात केली जाणार आहे.
मुलगा हर्षवर्धन खरातला अटक; पत्नीचा शोध सुरू
SIT ने या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र केला आहे. काल रात्री उशिरा पोलिसांनी खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात याला ताब्यात घेऊन अटक केली. बापाच्या गुन्ह्यांमध्ये मुलाचा नेमका किती आणि कसा सहभाग होता, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. दुसरीकडे, खरातची पत्नी कल्पना खरात ही देखील या गुन्ह्यात तितकीच सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, मात्र ती सध्या फरार असून पोलीस पथके तिच्या मागावर आहेत.
शिर्डी फसवणूक प्रकरणात उद्या पुन्हा अटक?
जरी आज खरातला न्यायालयीन कोठडी मिळाली असली, तरी त्याचा कारागृहातील मुक्काम औटघटकेचा ठरण्याची शक्यता आहे. शिर्डी येथील एका मोठ्या फसवणुकीच्या गुन्ह्यात खरात पती-पत्नी आरोपी आहेत. या दुसऱ्या गुन्ह्यात पोलीस उद्या त्याला पुन्हा अटक करून पोलीस कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्या पुन्हा त्याला पोलीस कोठडी मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मोठे 'मासे' गळाला लागण्याची शक्यता
एसआयटीने आतापर्यंत केलेल्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत:
* दोन टप्प्यांतील चौकशी: १८ ते २४ मार्च आणि २५ ते २९ मार्च अशा दोन टप्प्यांत खरातची सखोल चौकशी करण्यात आली.
* आर्थिक व्यवहार: त्याच्या आर्थिक व्यवहारांची आणि खंडणी प्रकरणांची चौकशी सुरू असून आश्रमातून महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले आहेत.
* भीतीचे जाळे: महिलांना देवाच्या कोपाची भीती घालून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचे समोर आले आहे.
अशोक खरातच्या मालमत्तेची आणि त्याने जमवलेल्या अफाट संपत्तीची चौकशी एसआयटीकडून सुरू आहे. या तपासातून समाजातील अनेक बड्या व्यक्तींची नावे समोर येण्याची आणि मोठे 'मासे' गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.