हे वर्ष महात्मा फुले कार्य गौरव वर्ष म्हणून साजरे होणार... छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांना यश

Share:
Main Image
Last updated: 01-Apr-2026

मुंबई/नाशिक, (प्रतिनिधी) १ एप्रिल - महात्मा जोतीराव फुले यांच्या २०० व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'महात्मा फुले कार्य गौरव वर्ष' म्हणून साजरे करण्यासाठी विशेष राज्यस्तरीय उपक्रम राबविण्याबाबत यावे अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत महात्मा जोतीराव फुले यांच्या २०० व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'महात्मा फुले कार्य गौरव वर्ष' म्हणून साजरे करण्यासाठी विशेष राज्यस्तरीय उपक्रम राबविण्याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी विविध मागण्या मांडल्या. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे,  इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे तसेच संबंधित विभागांचे सचिव व अधिकारी उपस्थित होते.

महात्मा जोतीराव फुले हे आधुनिक भारतातील सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ व मानवमूल्यांचे पुरस्कर्ते होते. त्यांनी १९ व्या शतकात जातीय विषमता, अंधश्रद्धा, स्त्रीदमन आणि शिक्षणावरील बंदी याविरोधात निर्भयपणे लढा दिला. सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्यांनी समतेचा, सामाजिक न्यायाचा आणि मानवमुक्तीचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. शूद्र-अतिशूद्र, वंचित, शोषित समाजासाठी शिक्षण, पाणी, प्रतिष्ठा आणि समानतेसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यामुळेच महात्मा फुले यांचे विचार आजही संविधानिक मूल्ये, सामाजिक समरसता आणि समतेवर आधारित लोकशाहीसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरतात.महात्मा फुले यांचा जन्म दि.११ एप्रिल १८२७ सालचा. त्यांच्या जन्माला दि.११ एप्रिल २०२७रोजी २०० वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणजे यावर्षीच्या ११ एप्रिल पासून पुढील वर्षीच्या ११ एप्रिल पर्यंत महात्मा फुलेंची द्वीजन्मशताब्दी साजरी करायला हवी अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीत केली.

ते म्हणाले की, महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी २०२७ हे संपूर्ण वर्ष महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विविध सामाजिक उपक्रमांसाठी समर्पित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे, ही बाब अत्यंत स्वागतार्ह व प्रेरणादायी आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनानेही पुढाकार घेऊन हे वर्ष 'महात्मा फुले स्मृती व कार्य गौरव वर्ष' म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानले.
महात्मा फुले यांचे विचार केवळ इतिहासाचा भाग नसून आजच्या आणि उद्याच्या पिढीसाठी मार्गदर्शक आहेत. त्यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त राबविले जाणारे हे उपक्रम महाराष्ट्राच्या सामाजिक प्रबोधनाची परंपरा अधिक बळकट करतील, तसेच राज्याच्या पुरोगामी ओळखीला नवी ऊर्जा देतील. त्यामुळे महात्मा जोतीराव फुले यांच्या २०० व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त  'महात्मा फुले कार्य गौरव वर्ष' म्हणून साजरे करण्यासाठी विशेष राज्यस्तरीय उपक्रम राबविण्याबाबत यावे अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीत केल्या.

मंत्री छगन भुजबळ यांनी केल्या या सूचना..

- महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस्थळांचा सर्वांगीण विकास करण्यात यावा. यामध्ये पुणे येथील फुलेवाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारीकरण - महात्मा फुले यांच्या राज्य संरक्षित स्मारकाशेजारी दिडशे मीटर अंतरावर पुणे महानगरपालिकेच्या मिळकतीमध्ये महानगरपालिकेमार्फत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे काम करण्यात आलेले आहे. या दोन्ही स्मारकांना जोडण्यासाठी रस्ता आणि त्याचप्रमाणे फुले वाड्याच्या आजूबाजूला राहत असलेल्या काही नागरिकांच्या जागा संपादित करून या स्मारकाचे विस्तारीकरण प्रस्तावित आहे. मात्र या भुसंपादनाचे काम अतिशय रेंगाळले आहे.

भिडेवाडा (पुणे) येथील राष्ट्रीय स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून हे स्मारक राष्ट्राला अर्पण करणे, सावित्रीबाईचे जन्मस्थळ नायगाव, महात्मा फुले यांचे जन्मस्थळ कटगुण जि. सातारा यासह सत्यशोधक समाजाशी संबंधित स्थळे यांचा ऐतिहासिक व सांस्कृतिक जतन व विकास.

- राज्यस्तरीय 'महात्मा फुले विचार संमेलन' व परिसंवादांचे आयोजन महात्मा फुले यांनी ज्या-ज्या विषयांवर काम केले अशा विविध विषयांवर उदा. सामाजिक न्याय, शिक्षण, स्त्री सबलीकरण, शेती, संविधानिक मूल्ये यावर आधारित परिषद, व्याख्याने व चर्चासत्रे.

-विविध शैक्षणिक उपक्रम- जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये विशेष उपक्रम

- महात्मा फुले यांच्या विचारांवर आधारित अभ्यासक्रम, संशोधन प्रकल्प, फेलोशिप, शिष्यवृत्ती योजना.

- शाळा, महाविद्यालयांमध्ये विशेष व्याख्यानमाला व निबंध, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा.

-सामाजिक प्रबोधन व जनजागृती अभियान- राज्यभर 'महात्मा फुले विचार रथ', लोककला,पथनाट्य, चित्रफीत व डिजिटल माध्यमांतून जनजागृती.

- ग्रंथ, साहित्य व डिजिटल संग्रह- महात्मा फुले यांचे साहित्य, चरित्र, विचार यांचे नव्याने प्रकाशन, अनुवाद व डिजिटल संग्रहालयाची निर्मिती. महात्मा जोतीराव फुले यांच्या वाड्मयाच्या जास्तीत जास्त प्रतींची छपाई करून वितरणासाठी उपलब्ध करणे.

-महिला सक्षमीकरण व वंचित घटकांसाठी विशेष योजना-स्त्री शिक्षण, स्वयंरोजगार, कौशल्य विकास यासाठी फुले-सावित्रीबाई विचारांवर आधारित विशेष योजना.९) राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने कलिना येथे उभारण्यात आलेल्या 'फुले शाहू आंबेडकर आंतरराष्ट्रीय ग्रंथालय' या इमारतीचे लोकार्पण करणे.

Advertisement

- नायगावचे 'क्रांतीज्योती सावित्रीनगर' असे नामकरण करणे,

- महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त "महात्मा फुले २००" हे विशेष बोधचिन्ह मंजूर करून राज्य शासनाच्या सर्व शासकीय पत्र व्यवहारांवर वापरणे.

- महात्मा फुलेंच्या नावाने सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी पुरस्कार देणे

- सर्व विद्यापीठांमध्ये पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमात महात्मा फुलेंच्या साहित्याचा समावेश करणे

- सीबीएससी स्टेट बोर्ड इत्यादी सर्व शिक्षण मंडळांच्या शालेय अभ्यासक्रमात महात्मा फुले यांच्या साहित्याचा समावेश करणे

- महात्मा फुले जयंती दिवशी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात अभिवादन करणे /प्रबोधन सत्र राबविणे

- राज्य शासने आंतरराष्ट्रीय महात्मा फुले सामाजिक संशोधन केंद्र स्थापन करणे सावित्रीबाई फुले यांच्या नावाने महिला आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र स्थापन करणे

- महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राचे मुद्रण करणे

- चित्ररूपातील महात्मा फुले (साहित्य सांस्कृतिक मंडळाने प्रकाशित करावे)

- ११ एप्रिल रोजी प्रत्येक शाळेने प्रभात फेरी काढणे, अभिवादन करणे, विशेष व्याख्यान आयोजित करणे

शासनाच्या महात्मा फुले यांच्या जीवनावरील चित्रपट या वर्षात प्रदर्शित करावा.

त्यांचे विचारधन आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी शासनाच्या वतीने विदेशातील विद्यापीठांमध्ये कार्यक्रम घ्यावे

महात्मा फुले यांचे विचार केवळ इतिहासाचा भाग नसून आजच्या आणि उद्याच्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहेत. म्हणून 'महात्मा फुले कार्य गौरव वर्ष' म्हणून साजरे करण्यासाठी हे उपक्रम राज्यभर व्यापक स्वरूपात राबविले जावेत, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना केली.

Comments

No comments yet.