नवी दिल्ली, (प्रतिनिधी) ३१ मार्च - देशातील २०२७ मध्ये होणाऱ्या आगामी जनगणनेसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि सामाजिक क्रांती घडवणारा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंतच्या जनगणनेत केवळ कायदेशीररित्या विवाह झालेल्या जोडप्यांचीच नोंद 'विवाहित' म्हणून केली जात होती. मात्र, आता लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये (Live-in Relationship) राहणाऱ्या आणि आपले नातेसंबंध 'स्थिर' मानणाऱ्या जोडप्यांनाही जनगणनेत 'विवाहित' म्हणून गणले जाणार आहे.
सामाजिक स्थितीची अचूक आकडेवारी मिळणार देशात विशेषतः मेट्रो शहरांमध्ये लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. या बदलामुळे देशातील लोकसंख्या आणि कौटुंबिक स्थितीची अधिक वास्तववादी आणि अचूक आकडेवारी सरकारकडे उपलब्ध होणार आहे. सामाजिक बदलांची दखल घेत प्रशासकीय स्तरावर घेतलेला हा मोठा निर्णय मानला जात आहे.
यंदाची जनगणना पूर्णपणे 'डिजिटल' २०२७ ची जनगणना ही पूर्णपणे डिजिटल स्वरूपाची असेल. याची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
स्व-गणना (Self-enumeration): नागरिक स्वतःची माहिती ऑनलाइन पोर्टलवर भरू शकतील.
वेळापत्रक: घर-यादीचा टप्पा १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या काळात पार पडणार असून, एकूण प्रक्रिया ४५ दिवसांची असेल.
कालावधी: सुरुवातीचे १५ दिवस नागरिकांना 'स्व-गणना' करण्यासाठी दिले जातील. उर्वरित ३० दिवसांत गणक प्रत्यक्ष घरी येऊन माहितीची पडताळणी करतील.
भाषा: हे विशेष वेब पोर्टल इंग्रजीसह १५ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असेल.
पुराव्याची गरज नाही; विश्वासार्हतेवर भर स्व-गणना करताना नागरिकांना त्यांनी दिलेल्या उत्तरांसाठी कोणत्याही कायदेशीर पुराव्याची किंवा प्रमाणपत्राची गरज भासणार नाही. नागरिकांनी आपल्या विश्वासावर आधारित दिलेली माहिती गणकांना जशीच्या तशी नोंदवणे बंधनकारक असणार आहे. फॉर्म भरल्यानंतर एक 'SE आयडी' तयार होईल, जो पडताळणीसाठी गणकाला देणे आवश्यक आहे.
महत्त्वाची सूचना: फॉर्म भरताना घराचे अचूक ठिकाण, गल्ली आणि पिन कोड नमूद करणे आवश्यक आहे. डिजिटल नकाशावर घराचा 'मार्कर' योग्य ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे, जेणेकरून गणकांना घर शोधण्यात अडचण येणार नाही. एकदा फॉर्म सबमिट केल्यास, त्यात बदल करण्याचे अधिकार फक्त गणकांकडेच असतील.