पुणे, (प्रतिनिधी) २९ मार्च - "काळ पुढे सरकतोय, पण मन अजूनही तुमच्याच आठवणींमध्ये गुंतून राहिले आहे. प्रत्येक क्षणी तुमची उणीव प्रकर्षाने जाणवते," अशा शब्दांत सुनेत्रा पवार यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. दादांच्या निधनाला आज दोन महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर करत आदरांजली वाहिली.
सुनेत्रा पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये दादांच्या लोकाभिमुख आणि विकासाभिमुख व्यक्तिमत्त्वाचा विशेष उल्लेख केला आहे. "तुम्ही केवळ एक नेते नव्हता, तर असंख्य लोकांच्या आयुष्यात विश्वास, बळ आणि आशा निर्माण करणारे आधारस्तंभ होता," असे म्हणत त्यांनी दादांच्या कार्याचा गौरव केला.
दैनंदिन कामातही 'दादां'चेच मार्गदर्शन
राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करताना आजही दादांचे अस्तित्व जाणवत असल्याचे सुनेत्रा वहिनींनी म्हटले आहे. "लोककल्याणासाठी निर्णय घेताना या परिस्थितीत तुम्ही काय केले असते, हाच विचार करून मी प्रत्येक पाऊल उचलते," असे सांगत त्यांनी दादांची कार्यपद्धती आणि दूरदृष्टी हीच आपली मार्गदर्शक असल्याचे स्पष्ट केले.
विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराची वाटचाल दादांच्या प्रेरणेनेच अखंड सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. दादांनी दिलेली शिकवण, मूल्ये आणि त्यांचा वारसा हेच आता पुढचा मार्ग उजळवणारे दीप असल्याचे सांगत, त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचा निर्धार सुनेत्रा पवार यांनी या निमित्ताने व्यक्त केला आहे.
"तुमच्या अनुपस्थितीत निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही. पण तुमचे शब्द आणि आठवणी मला आजही उभे राहण्याची ऊर्जा देतात," अशा शब्दांत त्यांनी आपला शोक आणि संकल्प मांडला आहे.
?s=20