सिंहस्थापूर्वी कुशावर्त तीर्थ घेणार मोकळा श्वास... जलशुद्धीकरणाचा असा आहे मास्टर प्लॅन...

Share:
Main Image
Last updated: 27-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २७ मार्च - सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्त कुंडाच्या कायापालटासाठी 'नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणा'ने कंबर कसली आहे. भाविकांना स्नानासाठी स्वच्छ आणि निर्मळ पाणी मिळावे या उद्देशाने येथे अत्याधुनिक जलशुद्धीकरण आणि पुनरुज्जीवन प्रकल्प राबवण्यात येणार असून, ऑगस्ट २०२६ पर्यंत हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत हा प्रकल्प साकारला जाणार आहे.

पाण्याची निर्मळता प्रत्यक्ष दिसणार
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला येणाऱ्या कोट्यवधी भाविकांसाठी कुशावर्त कुंड हे मुख्य स्नानस्थळ आहे. सध्या या कुंडातील पाण्याचा पुनर्वापर चक्राचा (Recycling Cycle) कालावधी सुमारे ९ तासांचा आहे. नवीन यंत्रणेमुळे हा कालावधी ३ तासांपेक्षा कमी होईल, ज्यामुळे गर्दीच्या वेळीही पाणी स्वच्छ राहील.

Advertisement

"माननीय मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, पवित्र स्थळांवरील पाणी केवळ तांत्रिकदृष्ट्या स्वच्छ असून चालणार नाही, तर ते स्वच्छ दिसणेही तितकेच महत्त्वाचे आहे. भाविकांना स्नानावेळी पाण्याची पारदर्शकता जाणवली पाहिजे. याच हेतूने कुशावर्तसाठी हा प्रकल्प राबविला जात आहे."
— शेखर सिंह, आयुक्त, कुंभमेळा प्राधिकरण

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये:
अत्याधुनिक फिल्टरेशन: पाण्याचा पुनर्वापर वेगवान करून २४ तास स्वच्छता राखली जाईल.
निर्माल्य व्यवस्थापन: निर्माल्य थेट कुंडात जाऊ नये यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे.
देखभाल व दुरुस्ती: प्रकल्पाच्या यशस्वी संचालनासाठी स्वतंत्र 'ऑपरेशन अँड मेंटेनन्स' टीम नियुक्त केली जाईल.
पुरातत्त्व जतन: राज्य पुरातत्त्व विभागामार्फत परिसरातील मंदिरे, पायऱ्या आणि प्लॅटफॉर्मचे जतन तीन टप्प्यांत केले जात आहे.

नऊ पवित्र तीर्थांचे होणार पुनरुज्जीवन
केवळ कुशावर्तच नव्हे, तर त्र्यंबकेश्वर परिसरातील इतर ९ महत्त्वाच्या तीर्थांचाही चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने इंद्र कुंड, बिल्व तीर्थ, प्रयाग तीर्थ, मुकुंदेश्वर तीर्थ, संगम तीर्थ, गौतमेश्वर मंदिर आणि तलावाचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी प्रकाशयोजना आणि कपडे बदलण्याच्या खोल्यांचे नूतनीकरण केले जाणार आहे.

Comments

No comments yet.