प्राणघातक हल्ला करून भरदिवसा शेतकऱ्याला लुटले... नाशिक कृउबा समितीत रक्ताचा सडा...

Share:
Main Image
Last updated: 27-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २७ मार्च - राज्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (मार्केट यार्ड) आवारात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. गुरुवारी (दि. २६) सकाळी शेतमाल विक्रीसाठी आलेल्या तिल्लोळी येथील एका तरुण शेतकऱ्यावर तीन भामट्यांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला करून रोख रक्कम लुटली. या घटनेमुळे बाजार समिती परिसरात घबराटीचे वातावरण पसरले असून, शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील मधुकर गांगोडे (वय ३०, रा. तिल्लोळी, पो. कोचरगाव) हे गुरुवारी सकाळी दिंडोरी रोडवरील मार्केट यार्डात आपला शेतमाल विक्रीसाठी आले होते. मालाची विक्री करून परतीच्या प्रवासाला निघण्याच्या तयारीत असतानाच, बाजार समितीच्या आवारात तीन अनोळखी संशयितांनी त्यांना गाठले.
काही कळण्याच्या आतच या टोळक्याने गांगोडे यांना अकारण शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांनी त्यांना घट्ट पकडून ठेवले, तर तिसऱ्याने त्यांच्या खिशातील ३ हजार रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली.

Advertisement

धारदार शस्त्राने वार
केवळ लूट करून हे भामटे थांबले नाहीत, तर प्रतिकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गांगोडे यांच्या मानेवर एका संशयिताने धारदार शस्त्राने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात गांगोडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. भरदिवसा आणि गजबजलेल्या बाजार समितीच्या आवारात अशा प्रकारे रक्तरंजित थरार घडल्याने उपस्थित शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल
याप्रकरणी सुनील गांगोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात तिन्ही संशयितांविरुद्ध जबरी लुटमार आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक शरद पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करीत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेतला जात आहे.

मायलेकींना बेदम मारहाण...
नाशिक : हातउसनवार दिलेल्या पैशांच्या वादातून तीन जणांच्या टोळक्याने मायलेकींना बेदम मारहाण केल्याची घटना जेलरोड भागातील शिवाजीनगर येथे घडली. या घटनेत महिलेची सोनसाखळी गहाळ झाली असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोहर राठोड, वैशाली राठोड व अर्चना नामक महिलेविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समीना अल्लाउद्दीन शेख (रा.भगवाचौक जवळ शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला व संशयित एकमेकांचे परिचीत असून काही महिन्यांपूर्वी शेख यांनी मनोहर राठोड यास हातउसनवार पैसे दिले होते. या पैशांची मागणी केल्याने ही घटना घडली. पैसे मागितल्याचा राग आल्याने संशयितांनी बुधवारी (दि.२५) महिलेचे घर गाठून तिला व तिच्या मुलीला बेदम मारहाण केली. या घटनेत लाथा बुक्यांसह झाडू आणि विटांनी मारहाण करण्यात आल्याने महिला जखमी झाली असून हवालदार गायकवाड तपास करीत आहेत.

Comments

No comments yet.