मुंबई (प्रतिनिधी) २६ मार्च - इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL) मैदानाबाहेर एक ऐतिहासिक व्यवहार झाला आहे. आयपीएलचा गतविजेता संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची (RCB) मालकी तब्बल १.७८ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे १६,७०६ कोटी रुपयांच्या विक्रमी बोलीसह विकली गेली आहे. यासह आरसीबी आता आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा संघ ठरला असून, त्याने राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्सचे विक्रम मोडीत काढले आहेत.
चार बड्या कंपन्यांचा कन्सोर्टियम
आरसीबीला विकत घेण्यासाठी चार मोठ्या कंपन्यांनी एकत्र येत 'कन्सोर्टियम' स्थापन केले होते. यामध्ये आदित्य बिर्ला ग्रुप, टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप, बोल्ट व्हेंचर्स आणि ब्लॅकस्टोन परपिच्युअल प्रायव्हेट इक्विटी स्ट्रॅटेजी यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड (USL) कडून आरसीबीचे १०० टक्के शेअर्स खरेदी केले आहेत. या करारामध्ये आरसीबीचा पुरुष संघ आणि दोन वेळा डब्ल्यूपीएल (WPL) चॅम्पियन राहिलेला महिला संघ अशा दोन्ही संघांचा समावेश आहे.
किंमतीत १६ पटीने वाढ
२००८ मध्ये जेव्हा विजय मल्ल्या यांनी आरसीबीला खरेदी केले होते, तेव्हा त्याची किंमत सुमारे ४४६ कोटी रुपये (१११.६ दशलक्ष डॉलर) होती. आजच्या बाजारमूल्यानुसार ही किंमत सुमारे १६ पटीने वाढली आहे. २०१६ मध्ये हा संघ यूएसएलकडे गेला होता आणि आता १० वर्षांनंतर संघाला
माजी क्रिकेटपटू आर्यमान बिर्ला आरसीबीचे नवे अध्यक्ष
या मोठ्या व्यवहारानंतर आरसीबीच्या अध्यक्षपदाची धुरा आदित्य बिर्ला ग्रुपचे संचालक आर्यमान बिर्ला यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. २८ वर्षीय आर्यमान बिर्ला हे केवळ यशस्वी व्यावसायिकच नाहीत, तर ते स्वतः प्रथम श्रेणी क्रिकेटपटू राहिले आहेत. त्यांनी मध्य प्रदेशसाठी रणजी ट्रॉफी खेळली असून २०१'८ मध्ये ते राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होते. क्रिकेट आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रांचा अनुभव असलेले आर्यमान आता आरसीबीच्या नव्या पर्वाचे नेतृत्व करणार आहेत.
राजस्थान रॉयल्स दुसऱ्या स्थानी
काही काळापूर्वीच राजस्थान रॉयल्सची मालकी १.६३ अब्ज डॉलरला (१५,२८९ कोटी रुपये) विकली गेली होती. भारतीय वंशाचे अमेरिकन व्यावसायिक काल सोमानी यांनी ही बोली लावली होती. मात्र, आता आरसीबीने हा आकडा पार करत अव्वल स्थान पटकावले आहे. २००८ मध्ये अवघ्या २६० ते २७० कोटींना विकत घेतलेल्या राजस्थान रॉयल्सच्या किमतीतही २४ पटीने वाढ झाली आहे.
१९ व्या हंगामाची सुरुवात हैदराबादविरुद्ध
मालकी बदलल्यानंतर आरसीबीचा संघ आता नव्या जोमाने मैदानात उतरणार आहे. आयपीएलच्या १९ व्या हंगामातील आरसीबीचा पहिला सामना २८ मार्च रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध रंगणार आहे. गतविजेता संघ आणि नवीन मालक यामुळे चाहत्यांमध्ये या सामन्याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.