आता कोणत्याही स्थानकावरून 'कन्फर्म' तिकीट... रेल्वे मंत्र्यांची मोठी घोषणा...

Share:
Main Image
Last updated: 28-Mar-2026

नवी दिल्ली, (विशेष प्रतिनिधी) २८ मार्च - रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी आणि तिकीट प्रणालीतील गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारने रेल्वे नियमावलीत 'आठवी' आणि 'नववी' मोठी सुधारणा केली आहे. या अंतर्गत आता प्रवाशांना गाडी सुटण्याच्या ३० मिनिटांपूर्वीपर्यंत आपले 'बोर्डिंग स्टेशन' (गाडीत चढण्याचे स्थानक) बदलता येणार असून, तिकीट रद्द केल्यावर परतावा मिळण्याची प्रक्रियाही स्वयंचलित (Automatic) करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

आता कोणत्याही स्थानकावरून 'कन्फर्म' तिकीट रद्द होणार
रेल्वे मंत्र्यांनी प्रवाशांसाठी मोठी घोषणा करताना सांगितले की, आता देशातील कोणत्याही रेल्वे स्थानकावरून 'काउंटर तिकीट' रद्द करता येईल. यापूर्वी तिकीट ज्या स्थानकावरून काढले आहे किंवा जिथून प्रवास सुरू होणार आहे, तिथेच ते रद्द करण्याचे बंधन होते, ते आता संपुष्टात आले आहे. तसेच ई-तिकिटांसाठी आता 'टीडीआर' (TDR) भरण्याची गरज उरणार नाही; तिकीट रद्द होताच परतावा थेट प्रवाशाच्या खात्यात जमा होईल.

ऐनवेळी 'बोर्डिंग' बदलण्याची मुभा
सुधारणा क्रमांक नऊनुसार, प्रवाशांना आता गाडी मूळ स्थानकावरून सुटण्याच्या ३० मिनिटांपूर्वीपर्यंत डिजिटल पद्धतीने आपले बोर्डिंग स्टेशन बदलता येईल. जर एखादा प्रवासी नियोजित स्थानकावरून गाडीत चढू शकला नाही, तर तो आपली आरक्षित जागा न गमावता पुढील सोयीस्कर स्थानकावरून गाडीत चढू शकणार आहे. यापूर्वी ही मर्यादा केवळ तक्ता (Chart) तयार होईपर्यंतच होती.

Advertisement

आरक्षण तक्ता आणि रद्द करण्याच्या नियमात बदल
तिकिटांचा काळाबाजार आणि 'तत्काळ' प्रणालीचा गैरवापर रोखण्यासाठी तिकीट रद्द करण्याच्या मुदतीत बदल करण्यात आले आहेत:
जुने नियम: ४८, १२ आणि ४ तास.
नवीन नियम: ७२, २४ आणि ८ तास.
तक्ता निर्मिती: आता आरक्षण तक्ता प्रवासाच्या ४ तास आधी तयार न होता, ९ ते १८ तास आधीच तयार केला जाईल. यासाठी प्रवाशांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले जाणार नाही.

प्रवास 'अपग्रेड' करणे झाले सोपे
प्रवाशांच्या सोयीसाठी गाडी सुटण्यापूर्वी ३० मिनिटांपर्यंत आपला प्रवासाचा वर्ग (उदा. स्लीपर ते एसी) अपग्रेड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापूर्वी तक्ता तयार होण्यापूर्वीच हे बदल करावे लागत असत.

ठळक वैशिष्‍ट्ये:
कठोर पाऊल: तिकीट दलालांवर वचक बसवण्यासाठी रद्द करण्याच्या मुदतीत वाढ.
डिजिटल सुविधा: बोर्डिंग स्टेशन बदलणे आता मोबाईलवरून शक्य.
ऑटो-रिफंड: ई-तिकिटांच्या परताव्यासाठी आता 'टीडीआर'ची कटकट नाही.
केंद्रीकृत सेवा: देशात कुठेही तिकीट रद्द करण्याची सोय.

Comments

No comments yet.