नाशिक हादरले... २४ तासांत पाच जणांची आत्महत्या...

Share:
Main Image
Last updated: 25-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २५ मार्च - शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले आत्महत्येचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, मंगळवारी (दि. २४) एकाच दिवसात पाच जणांनी आपली जीवनयात्रा संपविली. यामध्ये नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील एका कैद्यासह १६ वर्षीय मुलाचाही समावेश असल्याने शहर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या सर्व घटनांप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.

कारागृहात कैद्याचा टोकाचा निर्णय
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला कैदी शंकर काशिनाथ भोंगाडे (३२, शिक्षाबंदी क्र. १२९४८) याने मंगळवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या बॅरेकमध्ये गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच कारागृह प्रशासनाने त्याला तातडीने रुग्णालयात हलवले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नाशिकरोड पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सूर्यवंशी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Advertisement

अंबडमध्ये १६ वर्षीय मुलाची आत्महत्या
दुसरी हृदयद्रावक घटना अंबड लिंकरोडवरील दत्तनगर भागात घडली. ऋषीकेश संतोष केंद्रे (१६) या अल्पवयीन मुलाने आपल्या राहत्या घरातील बेडरूमच्या गॅलरीत गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

सातपूर, पंचवटी आणि इंदिरानगरमध्येही मृत्यूचे तांडव
शिवाजीनगर (सातपूर): कैलास मोहन शेलार (४१) यांनी घरामागील पत्र्याच्या खोलीत लोखंडी अँगलला ओढणी बांधून गळफास घेतला. गंगापूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दिंडोरी रोड (पंचवटी): भुपेंद्रभाई रमणभाई पटेल (७२) या वृद्धाने राहत्या घरात खिडकीच्या अँगलला दोरी बांधून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
चेतनानगर (इंदिरानगर): रितेश दत्तात्रेय चौधरी (३२) या तरुणाने दुपारच्या सुमारास राहत्या घरात पंख्याच्या हुकाला साडी बांधून जीवन संपविले. इंदिरानगर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
एकाच दिवशी पाच जणांनी टोकाचे पाऊल उचलल्यामुळे नाशिकमध्ये मानसिक आरोग्य आणि सामाजिक प्रश्नांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. या पाचही घटनांमधील आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस प्रशासन पुढील तपास करत आहे.

मदत हवी आहे?
जर तुमच्या मनात निराशेचे विचार येत असतील किंवा ओळखीच्या कोणाला मदतीची गरज असेल, तर कृपया मानसोपचारतज्ज्ञांशी संपर्क साधा किंवा हेल्पलाइन क्रमांकांवर मदत मागा. जीवन अमूल्य आहे.

Comments

No comments yet.