रामनवमी गुरुवारी की शुक्रवारी? नाशिकच्या काळाराम मंदिराचा मोठा निर्णय... संभ्रम दूर!

Share:
Main Image
Last updated: 25-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २५ मार्च - प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरामध्ये यंदा 'श्रीराम नवमी' उत्सव गुरुवार, दिनांक २६ रोजी साजरा होणार आहे. तिथीच्या गणितावरून भाविकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी प्रसिद्ध धर्मशास्त्र अभ्यासक श्रीमहंत सुधीरदास महाराज यांनी शास्त्राधारे हा निर्णय जाहीर केला आहे.

Advertisement

दुपारी १२ वाजता नवमी असणे अनिवार्य
रामनवमीच्या मुहूर्ताबद्दल माहिती देताना सुधीरदास महाराज म्हणाले की, 'निर्णयसिंधू' आणि 'धर्मसिंधू' यांसारख्या प्रमाणभूत ग्रंथांनुसार, रामजन्माचा सोहळा हा 'माध्यान्ह काळी' म्हणजेच दुपारी १२ वाजता होणे शास्त्रसंमत आहे.
गुरुवार, २६ तारीख: सकाळी ११ वाजून ४९ मिनिटांच्या सुमारास अष्टमी संपून नवमी तिथीला प्रारंभ होत आहे. त्यामुळे माध्यान्ह काळी (दुपारी १२ वाजता) नवमी तिथी उपलब्ध आहे.
शुक्रवार, २७ तारीख: दुसऱ्या दिवशी माध्यान्ह काळी नवमी तिथी शिल्लक राहत नाही.
यामुळेच शास्त्रार्थाचा विचार करता गुरुवार, २६ रोजीच रामनवमी साजरी करणे उचित ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोटी सूर्यग्रहणापेक्षाही अधिक महत्त्व
महंतांनी 'रामार्चनचन्दिका' या १०० वर्षांहून अधिक जुन्या आणि दुर्मिळ ग्रंथाचा संदर्भ देत सांगितले की:
"श्रीराम नवमी प्रोक्ता कोटी सूर्यग्रहाधिका"
अर्थात, एका बाजूला कोटी सूर्यग्रहणांचे पुण्य आणि दुसऱ्या बाजूला एकटी रामनवमी; तरीही रामनवमीचे फळ अधिक आहे. हिंदू धर्मशास्त्रामध्ये या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व असून, तो अत्यंत मंगलदायक मानला जातो.
असे करा पूजन व अर्चन
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांची कृपा प्राप्त करण्यासाठी या दिवशी भाविकांनी विशेष भक्ती करावी, असे आवाहन सुधीरदास महाराजांनी केले आहे. त्यांनी खालील उपासना सुचवल्या आहेत:
प्रभू रामचंद्रांचे नामस्मरण व पूजन.
विशेष 'तुलसी अर्चना' अर्पण करणे.
माध्यान्ह काळी रामजन्माचा सोहळा साजरा करणे.
नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांनी २६ तारखेलाच उत्साहात रामजन्मोत्सव साजरा करावा, अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.

Comments

No comments yet.