नाशिक, (प्रतिनिधी) २३ मार्च - उन्हाळी सुट्या आणि प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. संतनगरी शेगाव येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या बडनेरा-नाशिक रोड-बडनेरा (०१२११/०१२१२) अनारक्षित दैनिक मेमू गाडीला आता १५ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राला जोडणारा हा महत्त्वाचा रेल्वे मार्ग प्रवाशांसाठी उपलब्ध राहणार आहे.
वेळापत्रकात कोणताही बदल नाही
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, मुदतवाढ मिळालेल्या या मेमू गाडीच्या वेळापत्रकात, डब्यांच्या रचनेत किंवा थांब्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ही गाडी पूर्वीप्रमाणेच आपल्या निर्धारित वेळेत धावेल.
गाडी क्र. ०१२११ (बडनेरा ते नाशिक रोड): बडनेरा येथून दररोज सकाळी १०.०५ वाजता सुटते आणि त्याच दिवशी सायंकाळी ७.०५ वाजता नाशिक रोडला पोहोचते.
गाडी क्र. ०१२१२ (नाशिक रोड ते बडनेरा): नाशिक रोड येथून दररोज रात्री ९.१५ वाजता सुटते आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३५ वाजता बडनेरा येथे पोहोचते.
शेगाव दर्शनासाठी 'खास' सोय
ही गाडी सकाळी १०.०५ ला बडनेराहून सुटल्यानंतर दुपारी १२.०० वाजेपर्यंत शेगाव स्थानकावर पोहोचते. त्यामुळे संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी ही गाडी अत्यंत सोयीची ठरत आहे. तसेच भुसावळ, जळगाव आणि नाशिकला जाणाऱ्या नोकरदार व व्यवसायिकांसाठीही ही गाडी वरदान ठरली आहे.
अमरावतीकरांना थेट प्रवासाची संधी
या गाडीचे नाव 'बडनेरा-नाशिक रोड' असले तरी, देखभालीसाठी ही गाडी पहाटे अमरावती रेल्वे स्थानकावर येते. स्वच्छता आणि देखभालीची कामे आटोपल्यानंतर सकाळी ९.३० वाजता ही मेमू अमरावतीहून बडनेराकडे रवाना होते. ज्या प्रवाशांना ही माहिती आहे, ते थेट अमरावती स्थानकावरूनच तिकीट काढून या गाडीत बसतात, ज्यामुळे त्यांना बडनेरापर्यंत जाण्याचा अतिरिक्त त्रास सहन करावा लागत नाही.
प्रमुख थांबे आणि कोच रचना
८ डब्यांची ही अनारक्षित मेमू गाडी प्रवासात खालील प्रमुख स्थानकांवर थांबते:
मूर्तिजापूर, बोरगाव, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, काजगाव, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव आणि निफाड.
गाडी कायमस्वरूपी करण्याची मागणी
अल्प दरात जलद प्रवास आणि सोयीस्कर वेळापत्रक यामुळे या मेमू गाडीला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सध्या ही गाडी विशेष (Special) म्हणून चालवली जात असली तरी, प्रवाशांची वाढती संख्या पाहता ही सेवा कायमस्वरूपी सुरू ठेवावी, अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरत आहे.