मुंबई, (प्रतिनिधी) २३ मार्च - भोंदूबाबाच्या कारनाम्यावरून राजकारण तापले असताना, भारतीय जनता पार्टीने आता थेट उद्धव ठाकरे यांनाच लक्ष्य केले आहे. "ज्या भोंदूबाबाला पायघड्या घालण्याचे आणि त्याच्या आश्रमाला पाणीपुरवठा करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले, त्या न्यायाने उद्धव ठाकरे यांनाही या प्रकरणात सहआरोपी करायचे का?" असा धारदार सवाल भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवारी उपस्थित केला.
मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या आरोपांचा खरपूस समाचार घेत उबाठा गटावर जोरदार टीकास्त्र सोडले.
'मविआ'ने भोंदूबाबाला पाठीशी घातले
नवनाथ बन म्हणाले की, या भोंदूबाबाचे कारनामे २००३ पासून सुरू होते. मात्र, तत्कालीन काँग्रेस सरकार आणि त्यानंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने त्याला बेड्या ठोकण्याची हिंमत दाखवली नाही. उलट उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारने या भोंदूबाबाला सर्व सोयीसुविधा पुरवल्या. "जर केवळ फोटोंवरून महायुतीच्या ९ मंत्र्यांना सहआरोपी करण्याची मागणी संजय राऊत करत असतील, तर मग ज्यांच्या काळात या बाबाला राजाश्रय मिळाला, त्या उद्धव ठाकरेंवरही कारवाई व्हायला हवी. न्याय सर्वांना एकच असायला हवा," असेही बन यांनी ठणकावून सांगितले.
फडणवीसांचे अभिनंदन करणारे राऊत आता टीका का करतात?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनेच या भोंदूबाबाला बेड्या ठोकण्याचे धाडस दाखवले, असे सांगत बन यांनी राऊतांच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवले. "चार दिवसांपूर्वी याच कारवाईबद्दल फडणवीसांचे अभिनंदन करणारे राऊत आज मात्र राजकारण करत असल्याचा आरोप करत आहेत, हा मोठा विनोद आहे. खोटेनाटे आरोप करून हीन दर्जाचे राजकारण करण्यात राऊतांचा कोणीही हात धरू शकणार नाही," असा टोला त्यांनी लगावला.
ठाकरे गटात अंतर्गत संघर्ष: 'राऊत विरुद्ध ठाकरे'
उबाठा गटातील अंतर्गत यादवीवर भाष्य करताना नवनाथ बन यांनी दावा केला की, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात सध्या तीव्र संघर्ष सुरू आहे. दिल्लीत झालेल्या संजय राऊत यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला निमंत्रण असूनही उद्धव ठाकरे यांनी जाणे टाळले. हा संघर्ष येणाऱ्या काळात अधिक तीव्र होईल आणि यामुळेच पक्षाचे खासदार-आमदार नाराज असल्याचे त्यांनी नमूद केले.
"उद्धव ठाकरे हे कर्तृत्वशून्य मुख्यमंत्री"
उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळावर टीका करताना बन म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या कृपेने आमदार झालेले ठाकरे हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात 'कर्तृत्वशून्य' मुख्यमंत्री ठरले. त्यांनी अडीच वर्षांत ना मंत्रालयात हजेरी लावली, ना विधान परिषदेत राज्याच्या हिताचा एकही प्रश्न विचारला. खुद्द शरद पवार यांनीही त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीवरून त्यांची अवहेलना केली होती, याची आठवणही त्यांनी करून दिली.
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार भोंदूबाबाच्या काळ्या कृत्यांना साथ देणाऱ्या सर्वांची चौकशी करेल आणि दोषींवर कठोर कारवाई करेल, अशी ग्वाही देखील नवनाथ बन यांनी यावेळी दिली."