ओबीसी चळवळीचा बुलंद आवाज हरपला... शब्बीर अन्सारी यांचे निधन...

Share:
Main Image
Last updated: 22-Mar-2026

 

नाशिक (प्रतिनिधी) दि. २२ मार्च २०२६

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस आणि ऑल इंडिया ओबीसी मुस्लिम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी यांच्या निधनाने ओबीसी चळवळीचा एक झुंजार आणि निष्ठावान नेता हरपला आहे. त्यांच्या निधनाबद्दल राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांनी तीव्र दुःख व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

लढवय्या सोबती गमावला: छगन भुजबळ

शब्बीर अन्सारी यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, "शब्बीर अन्सारी केवळ माझे सहकारी नव्हते, तर ओबीसी चळवळीतील अत्यंत विश्वासू आणि खंदे सोबती होते. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी आणि बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही अनेक दशके खांद्याला खांदा लावून संघर्ष केला. मुस्लिम ओबीसी समाजाला आरक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान ऐतिहासिक आहे."

Advertisement

भुजबळ यांनी त्यांच्या 'मंडलनामा' या ग्रंथाचा उल्लेख करताना सांगितले की, हा ग्रंथ सामाजिक चळवळीचा महत्त्वाचा दस्तऐवज असून येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील. अन्सारी यांनी मांडलेली भूमिका केवळ मुस्लिमांसाठी नसून ती संपूर्ण वंचित घटकांसाठी होती, अशा शब्दांत त्यांनी अन्सारी यांच्या कार्याचा गौरव केला.

सामाजिक चळवळीची न भरून निघणारी हानी: समीर भुजबळ

माजी खासदार समीर भुजबळ यांनी देखील अन्सारी यांना श्रद्धांजली वाहिली. "शब्बीर अन्सारी यांनी आयुष्यभर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा दिला. छगन भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी अनेक संघर्ष केले. त्यांच्या जाण्याने सामाजिक चळवळीची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेला एक मार्गदर्शक लोकनेता आपण गमावला आहे," असे त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

शब्बीर अन्सारी यांच्या निधनामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

 

Comments

No comments yet.