मुंबई (प्रतिनिधी), दि. २२ मार्च २०२६
महाराष्ट्रातील कृषी बाजार व्यवस्थेचे रूप पालटण्यासाठी आणि शेतकरी हिताच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी पणन मंत्री जयकुमार रावल यांचा फिलिपिन्सची राजधानी मनीला येथील दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे. आशियाई विकास बँकेच्या (एडीबी) सहकार्याने राज्यातील बाजार समित्यांचे आधुनिकीकरण आणि 'मॅग्नेट' सारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना आंतरराष्ट्रीय स्तरावर बळकटी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
'आशिया आणि पॅसिफिक अन्न प्रणाली मंच'मध्ये सहभाग
मनीला येथील आशियाई विकास बँकेच्या मुख्यालयात आयोजित ‘आशिया आणि पॅसिफिक अन्न प्रणाली मंच २०२६’ मध्ये मंत्री जयकुमार रावल यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक तथा 'मॅग्नेट' प्रकल्पाचे संचालक विनायक कोकरे उपस्थित होते. या जागतिक मंचावर महाराष्ट्रातील कृषी पणन व्यवस्थेचे सादरीकरण करण्यात आले.
'एडीबी'च्या उपाध्यक्षांशी सकारात्मक चर्चा
दौऱ्यादरम्यान मंत्री रावल यांनी आशियाई विकास बँकेचे उपाध्यक्ष यिंगमिंग यांग यांची भेट घेतली. या बैठकीत राज्यातील खालील प्रमुख मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली:
काढणीपश्चात व्यवस्थापनावर भर
आशियाई विकास बँकेचे महासंचालक विनफ्रेड विकलेन आणि सीनियर सेक्टर डायरेक्टर कविंगफेंग झांग यांच्यासोबतही मंत्री रावल यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. महाराष्ट्रातील कृषी पायाभूत सुविधा, काढणीपश्चात व्यवस्थापन (Post-Harvest Management) आणि कृषी-लॉजिस्टिक्स क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी बँकेने सहकार्याचे सकारात्मक संकेत दिले आहेत. यामुळे शेतमालाची नासाडी कमी होऊन शेतकऱ्यांच्या पदरात अधिक नफा पडण्यास मदत होणार आहे.
"राज्यातील कृषी बाजार व्यवस्था आधुनिक, कार्यक्षम आणि शाश्वत बनविण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील हे सहकार्य मोलाचे ठरेल. 'मॅग्नेट' आणि 'एमआयएएम' सारख्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्रातील शेतकरी जागतिक बाजारपेठेशी अधिक सक्षमपणे जोडला जाईल."
— जयकुमार रावल, पणन मंत्री, महाराष्ट्र राज्य.