पुणे, (प्रतिनिधी) २१ मार्च - "माझे संपूर्ण कुटुंब वारकरी संप्रदायातील आहे, त्यामुळेच मी खरात यांच्या ट्रस्टशी जोडली गेले होते. मात्र, त्या व्यक्तीची दुसरी बाजू मला माहित नव्हती. एखादी व्यक्ती भविष्यात कशी वागेल किंवा काय करेल, याचा अंदाज आधीच कसा लावता येईल?" अशा शब्दांत राज्य महिला आयोगाच्या मावळत्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपली बाजू मांडली.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर चाकणकर माध्यमांशी बोलत होत्या. गेल्या काही दिवसांपासून एका प्रकरणावरून चाकणकर यांचे काही फोटो समाजमाध्यमांवर चर्चेत आले होते, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
वारकरी संस्कारांमुळे ओढ, पण...
आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा हवाला देत चाकणकर म्हणाल्या की, वारकरी संप्रदायाशी असलेल्या जवळीकीमुळे धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होणे स्वाभाविक होते. खरात यांच्या ट्रस्टसोबतचे नातेही याच भावनेतून निर्माण झाले होते. "एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात किंवा ट्रस्टच्या कामात माझ्यासारख्या अनेक लोकांचे फोटो संबंधित व्यक्तीसोबत असू शकतात. मात्र, त्या व्यक्तीच्या खासगी किंवा गुन्हेगारी कृतींशी आमचा संबंध जोडणे चुकीचे आहे," असे त्यांनी नमूद केले.
स्त्री म्हणून आरोपांचे शल्य
विरोधकांकडून किंवा समाजमाध्यमांतून होणाऱ्या टीकेवर भाष्य करताना त्या भावूक झाल्या. "एक महिला म्हणून माझ्यावर अशा प्रकारचे आरोप करण्यात आले, याचे मनाला खूप वाईट वाटते. सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या महिलेच्या चारित्र्यावर बोट ठेवणे सोपे असते, पण त्यामागची वस्तुस्थिती समजून न घेता आरोप करणे दुर्दैवी आहे," अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
राजीनाम्यानंतर नवी जबाबदारी?
रुपाली चाकणकर यांनी आपला राजीनामा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. महिला आयोगाच्या माध्यमातून त्यांनी गेल्या काही काळात राज्यभरात महत्त्वपूर्ण काम केले आहे. आता राजीनाम्यानंतर त्यांच्यावर आगामी काळात कोणती नवीन संघटनात्मक किंवा राजकीय जबाबदारी सोपवली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.