खळबळजनक... १४ वर्षे लैंगिक शोषण करणाऱ्या 'भोंदू' बाबाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची हजेरी?

Share:
Main Image
Last updated: 20-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २० मार्च - ज्या भोंदू बाबावर नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात एका महिलेचे १४ वर्षे लैंगिक शोषण आणि ५० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर गुन्हा दाखल आहे, अशा व्यक्तीच्या धार्मिक कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री आणि दिग्गज मंत्री उपस्थित राहणार असल्याचा दावा केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथे होणाऱ्या या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची नावे झळकल्याने 'प्रशासनाचा आशिर्वाद कुणाला?' असा सवाल उपस्थित केला जात आहे.

काय आहे प्रकरण?
काही महिन्यांपूर्वी नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गणेश बाबा उर्फ गणेश जगताप याच्यावर एका विवाहित महिलेने तक्रार दाखल केली होती. मांत्रिक असल्याचा बनाव करून आणि कुटुंबाला जीवे मारण्याची भीती दाखवून या भोंदूने २०१० पासून संबंधित महिलेवर वारंवार बलात्कार केला, तसेच वेळोवेळी ५० लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अटकेच्या भीतीने हा आरोपी बराच काळ फरार देखील होता.

पत्रिकेवरील नावांची मोठी मांदियाळी
आगामी २० मार्च ते २८ मार्च २०२६ या कालावधीत धारणगाव खडक येथे 'कामाख्या देवी मंदिर प्राणप्रतिष्ठा' सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 

या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर:
मुख्यमंत्री: देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री: एकनाथ शिंदे
जलसंपदामंत्री: गिरीश महाजन
अन्न व नागरी पुरवठा मंत्री: छगन भुजबळ
शिक्षण मंत्री: दादा भुसे
यासह अनेक खासदार आणि आमदारांची नावे 'प्रमुख अतिथी' म्हणून छापण्यात आली आहेत.

Advertisement

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीच्या कार्यक्रमात राज्याचे सर्वेसर्वा खरोखर येणार का, की केवळ नावांचा वापर करून लोकांमध्ये दहशत किंवा प्रभाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
पोलिस प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

ज्या व्यक्तीवर गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशा व्यक्तीच्या व्यासपीठावर लोकप्रतिनिधींनी जाणे हे कायद्याचे राज्य असलेल्या महाराष्ट्रासाठी भूषणावह नसल्याची टीका अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. अनेक महिलांचे आर्थिक व शारीरिक शोषण करणाऱ्या या बाबाला राजकीय कवच दिले जात आहे का? असा रोखठोक प्रश्न आता विचारला जात आहे.

"पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असूनही अशा भव्य कार्यक्रमांचे आयोजन करून आरोपी समाजाला काय संदेश देऊ पाहतोय? मुख्यमंत्री सचिवालयाने या नावाच्या वापराबद्दल स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे." 
- अंधश्रद्धा निर्मूलन समिती

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री खरोखर हजेरी लावणार की हा केवळ निमंत्रकाचा स्टंट आहे, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. मात्र, या पत्रिकेमुळे नाशिकच्या पोलीस आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Advertisement

Comments

No comments yet.