सॅम आणि मॅम बालकांसाठी विशेष मोहीम... जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहे तरी काय?

Share:
Main Image
Last updated: 17-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १७ मार्च - जिल्ह्यातील बालकांचे आरोग्य सुदृढ ठेवून कुपोषणाचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी तातडीच्या आणि प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशा कडक सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, महिला व बाल विकास उपायुक्त चंद्रशेखर पगारे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाने, मनपा उपायुक्त सोमनाथ कासार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बालकांच्या पोषणासाठी विशेष मोहिमेचे आदेश
जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले की, जिल्ह्यातील अतिदक्षता आवश्यक असलेल्या 'सॅम' (SAM) आणि 'मॅम' (MAM) श्रेणीतील बालकांची तत्काळ ओळख पटवून त्यांना आवश्यक औषधोपचार व पौष्टिक आहार उपलब्ध करून द्यावा. अंगणवाडी स्तरावर प्रत्येक महिन्यात 'मातृवंदन दिन' साजरा करून गर्भवती व स्तनदा मातांना बालसंगोपनाबाबत मार्गदर्शन करावे. तसेच 'पोषण ट्रॅकर ॲप'चा प्रभावी वापर करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना विशेष प्रशिक्षण देऊन प्रत्येक बालकाच्या वाढीचा नियमित आढावा घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

Advertisement

महिला सुरक्षेसाठी कडक पावले
महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि तक्रारींच्या निवारणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी खालील महत्त्वाचे निर्देश दिले:
महिला वसतिगृह तपासणी: वसतिगृहांच्या नियमित तपासणीसाठी 'वर्ग १' च्या महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी.
हुंडा प्रतिबंध जनजागृती: जिल्ह्यातील सर्व लॉन्स आणि मंगल कार्यालयांमध्ये हुंडा प्रतिबंधात्मक जनजागृतीचे फलक लावणे बंधनकारक करावे.
विशाखा समिती: प्रत्येक शासकीय आणि खासगी कार्यालयात 'कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध' अधिनियमानुसार अंतर्गत समिती स्थापन झाल्याची खात्री करावी.
भरोसा सेल: घरगुती हिंसाचाराच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी भरोसा सेलशी समन्वय साधावा.

योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा
'अमृत आहार योजना', 'बेबी केअर किट' आणि 'जननी सुरक्षा योजना' यांसारख्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक गरजू लाभार्थीपर्यंत पोहोचला पाहिजे. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अंतर्गत निधीचा वापर करून व्यापक स्वरूपात जनजागृती मोहीम राबवावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.

बैठकीच्या सुरुवातीला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाने यांनी जिल्ह्यातील विविध उपक्रमांच्या प्रगतीचे सादरीकरण केले. या बैठकीस शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिजित पळसकर, जिल्हा कामगार अधिकारी तुषार बोरसे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

Comments

No comments yet.