घाम फुटणार... उन्हाच्या कडाक्यासोबतच 'लाईट'चाही झटका... राज्यात पुन्हा लोडशेडींग...

Share:
Main Image
Last updated: 17-Mar-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १७ मार्च - राज्यात उन्हाचा कडाका वाढू लागताच विजेच्या मागणीने उच्चांक गाठला असून, महावितरणची यंत्रणा या वाढत्या मागणीसमोर हतबल झाल्याचे चित्र आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लोडशेडिंगमुक्त असलेल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारनियमनाचे संकट ओढवले आहे. महावितरणने शुक्रवारी आणि शनिवारी रात्रीच्या वेळी राज्यातील अनेक भागात सुमारे १००० मेगावॅटहून अधिक विजेचे भारनियमन केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

नेमकं कारण काय?
महावितरणच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यात तापमानात मोठी वाढ झाली आहे. मार्च महिन्यातच पारा वाढल्याने एसी, कुलर आणि पंख्यांचा वापर वाढला असून विजेची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यातच खालील प्रमुख कारणांमुळे पुरवठ्यावर परिणाम झाला आहे:
संध्याकाळचा तुटवडा: रात्रीच्या वेळी सौर ऊर्जा निर्मिती शून्य होते, ज्यामुळे संध्याकाळी ७ ते १० या वेळेत विजेची तूट निर्माण होत आहे.
वायू प्रकल्प ठप्प: 'गल्फ वॉर'च्या (आखाती युद्ध) पार्श्वभूमीवर वायू-आधारित वीज निर्मिती केंद्र पूर्णपणे बंद पडली आहेत.
गळती असलेल्या भागात फटका: ज्या गावांमध्ये वीज गळतीचे (Losses) प्रमाण जास्त आहे, अशा ठिकाणी सध्या दररोज ३ ते ४ तास लोडशेडिंग केले जात आहे.

Advertisement

उन्हाळ्याच्या तोंडावर चिंता वाढली
मार्च महिन्यातच जेव्हा तापमान ४० अंश सेल्सिअसच्या खाली आहे, तेव्हाच जर १००० मेगावॅटची तूट भासत असेल, तर एप्रिल-मे महिन्यात जेव्हा पारा ४५ अंशांच्या पार जाईल, तेव्हा काय स्थिती असेल? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. शनिवारी रात्री ८ वाजता महावितरणला मोठ्या प्रमाणावर वीज कपात करावी लागली, ज्यामुळे अनेक शहरे आणि ग्रामीण भाग अंधारात बुडाला होता.

महावितरणचे आश्वासन
या परिस्थितीवर बोलताना महावितरणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, "उन्हाळ्याच्या ऐन भरात भारनियमन टाळण्यासाठी कंपनी युद्धपातळीवर उपाययोजना करत आहे. अतिरिक्त वीज खरेदीसाठी प्रयत्न सुरू असून हे भारनियमन तात्पुरते आहे. लवकरच पुरवठा सुरळीत होईल."

कुठे होणार कपात? प्रामुख्याने जास्त वीज गळती असलेल्या फिडरवर.
किती वेळ? दररोज साधारण ३ ते ४ तास.
वेळ कोणती? प्रामुख्याने रात्री ८ ते १० च्या दरम्यान आणि पहाटेच्या सुमारास.

Comments

No comments yet.