मुंबई, (विशेष प्रतिनिधी) १६ मार्च - भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रसह देशातील सहा राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राहुरी (जि. अहिल्यानगर) आणि बारामती (जि. पुणे) या दोन हायप्रोफाईल मतदारसंघांचा समावेश आहे. या दोन्ही जागांसाठी २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार असून ४ मे रोजी निकाल जाहीर केला जाईल.
निवडणूक जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, "बारामती आणि राहुरी या दोन्ही ठिकाणी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आमची भूमिका आहे. मात्र, आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही पूर्ण ताकदीने लढायला तयार आहोत." मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे आता या जागा बिनविरोध होणार की चुरशीची लढत पाहायला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रिक्त जागांचे कारण राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले आणि बारामती मतदारसंघाचे आमदार अजित अनंतराव पवार यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. लोकप्रतिनिधींच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागा भरण्यासाठी आता निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे.
निवडणूक कार्यक्रम असा असेल:
अधिसूचना जारी होणे: ३० मार्च २०२६ (सोमवार)
अर्ज भरण्याची अंतिम तारीख: ६ एप्रिल २०२६ (सोमवार)
अर्जांची छाननी: ७ एप्रिल २०२६ (मंगळवार)
अर्ज मागे घेण्याची मुदत: ९ एप्रिल २०२६ (गुरुवार)
मतदान: २३ एप्रिल २०२६ (गुरुवार)
मतमोजणी व निकाल: ४ मे २०२६ (सोमवार)
ओळखपत्रासाठी 'हे' पुरावे ग्राह्य मतदानासाठी मतदार फोटो ओळखपत्र (EPIC) हा मुख्य पुरावा असेल. मात्र, ते उपलब्ध नसल्यास आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, बँक पासबुक किंवा मनरेगा जॉब कार्ड यांसारखी अधिकृत कागदपत्रेही ग्राह्य धरली जातील, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
आचारसंहिता आणि कडक नियम निवडणूक जाहीर होताच राहुरी आणि बारामती परिसरात आचारसंहिता लागू झाली आहे. विशेष म्हणजे, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना त्यांची माहिती प्रचारादरम्यान तीन वेळा प्रसिद्ध करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मतदानासाठी सर्व केंद्रांवर EVM आणि VVPAT यंत्रांचा वापर केला जाणार आहे.