या गैरव्यवहार प्रकरणात सरकारकडून १३३ कोटींची वसुली

Share:
Main Image
Last updated: 13-Mar-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १३ मार्च - राज्यातील स्टॅम्प ड्यूटी गैरव्यवहाराशी संबंधित प्रकरणांमध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली असून मीरा भाईंदर मधील स्टँप ड्युटी गैरव्यवहार प्रकरणी सुमारे 133 कोटी रुपयांची वसुली करण्यात आल्याची माहिती महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली.

महसूल विभागाच्या अर्थसंकल्पावरील मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री कदम म्हणाले की, मीरा भाईंदर मधील स्टँप ड्यूटीच्या 492 प्रकरणांची चौकशी सुरू करण्यात आली असून त्यापैकी 350 प्रकरणांमध्ये अंतिम आदेश देण्यात आले आहेत. उर्वरित 142 प्रकरणांची चौकशी सुरू असून त्यावर लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल. या प्रकरणांमध्ये आतापर्यंत सुमारे 35 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्यूटी आणि जवळपास 98 कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला असून संबंधितांना नोटिसाही देण्यात आल्या आहेत. या प्रकरणांची अधिक सखोल चौकशी करण्यासाठी नोंदणी उप महानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक, छत्रपती संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत करण्यात आली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर पुढील कारवाई करण्यात येईल, असेही कदम यांनी स्पष्ट केले.

Advertisement

चारकोप येथील कांदळवन क्षेत्रातील कथित अतिक्रमणाबाबत 48 तासांत जागेची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश तहसीलदारांना देण्यात आले आहेत. जर तेथे बेकायदेशीर बांधकाम आढळले, तर त्याचे तात्काळ निष्कासन करण्याचे आदेश दिले जातील, असेही राज्यमंत्री कदम यांनी सांगितले.

तसेच रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांशी संबंधित मुद्द्यांवरही मंत्रिमंडळ स्तरावर बैठक घेऊन चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले. अधिवेशनादरम्यान सदस्यांनी मांडलेल्या मतदारसंघाशी संबंधित प्रश्नांची लेखी उत्तरे दोन महिन्यांत दिली जातील, असेही त्यांनी सांगितले.

Comments

No comments yet.