राज्यात उन्हाच्या चटक्यानंतर पावसाची हजेरी... तब्बल  २८ जिल्ह्यांत 'अलर्ट'...

Share:
Main Image
Last updated: 12-Mar-2026

पुणे, (विशेष प्रतिनिधी) १२ मार्च - पुढील तीन दिवस राज्यात उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसणार असला, तरी त्यानंतर लगेचच वातावरणात बदल होणार आहे. येत्या रविवारपासून (१५ मार्च) विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रातील सुमारे २८ जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे.

पुढील ३ दिवस उष्णतेची लाट
आजपासून शनिवारपर्यंत (१४ मार्च) राज्यातील अनेक भागांत उष्णतेची लाट किंवा लाटेसदृश्य स्थिती राहील. यामध्ये प्रामुख्याने अलिबाग, डहाणू, हर्णाई, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी आणि बुलढाणा या भागांचा समावेश आहे. या काळात नागरिकांनी दुपारच्या वेळी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

१५ मार्चपासून पाऊस आणि दिलासा
रविवार दि. १५ मार्चपासून तापमानात घट होण्यास सुरुवात होईल. प्रामुख्याने १५ आणि १६ मार्च रोजी राज्यातील वातावरण ढगाळ होऊन पावसाला सुरुवात होईल.
बाधित जिल्हे: धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर यांसह संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील २८ जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह किरकोळ पाऊस पडू शकतो.
कोकणात काय स्थिती? मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर या पावसाचा फारसा परिणाम जाणवणार नाही, तेथे हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

उन्हाच्या झळा होणार कमी
पावसामुळे रविवारपासून दुपारच्या कमाल तापमानात घसरण होईल. यामुळे गेले काही दिवस जाणवणारा उन्हाचा ताप आणि हवेतील दमटपणा कमी होऊन नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

"शुक्रवार (१३ मार्च) ते मंगळवार (१७ मार्च) या काळात मुंबई-कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील. विशेषतः रविवार आणि सोमवारी २८ जिल्ह्यांत गडगडाटी पावसाची शक्यता आहे."
— माणिकराव खुळे (निवृत्त हवामान तज्ज्ञ, भारतीय हवामान खाते, पुणे)

Comments

No comments yet.