नाशिक, (प्रतिनिधी) ११ मार्च - शहरातील कायदा-सुव्यवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. गंगापूर गावात कारला कट लागल्याच्या वादातून दोन मित्रांना बेदम मारहाण करण्यात आली, तर रंगपंचमीचा आनंद लुटणाऱ्या एका युवकाला कालिदास कलामंदिर परिसरात धमकावून लुटल्याचा प्रकार घडला. या दोन्ही प्रकरणी गंगापूर आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
कारला कट मारल्याने 'राडा'
गंगापूर रोडवरील केशव सतेंद्र मुछाल आणि त्याचा मित्र इंद्रनील पगारे हे दोघे रविवारी (दि. ८) दुपारी कारने गंगापूर धरणाकडून शहराकडे परतत होते. गंगापूर गाव बस स्टॉप समोर फोक्सवॅगन जेक्टा कारमधून आलेल्या संशयित हर्षल अहिरे व त्याच्यासोबत असलेल्या एका टॅटू शॉपमधील कर्मचाऱ्याने मुछाल यांची कार अडविली. "कारला कट का मारला?" असा जाब विचारत संशयितांनी फायबरच्या पाईपने दोघांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात मुछाल व पगारे हे दोघेही जखमी झाले असून, संशयितांनी त्यांच्या कारचेही नुकसान केले. हवालदार ढमाले या प्रकरणाचा तपास करत आहेत.
रंगपंचमी खेळणाऱ्या युवकाची लूट
दुसरी घटना भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मेरी (दिंडोरी रोड) येथील विराज नितीनराव देशमुख (२५) हा युवक रविवारी आपल्या मित्रांसोबत शालिमार परिसरात रंगपंचमी खेळण्यासाठी आला होता. कालिदास कलामंदिरासमोरील मनपा मैदानावर रंगांची उधळण सुरू असताना, एका धडधाकड इसमाने विराजला बाजूला नेले. "तुझ्या खिशात काय आहे?" असे म्हणत दमदाटी करून संशयिताने विराजच्या खिशातील २० हजार रुपये किमतीचा मोबाईल बळजबरीने हिसकावून घेत पोबारा केला. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून उपनिरीक्षक रणदिवे पुढील तपास करत आहेत.