कांदा उत्पादकांना दिलासा देण्याबाबत विधिमंडळात झाली ही चर्चा...

Share:
Main Image
Last updated: 11-Mar-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ११ मार्च - राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे. कांदा हे नाशवंत पीक असल्यामुळे हमी भाव योजनेत त्याचा समावेश नसला तरी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेत असल्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी विधानपरिषदेत सांगितले. सदस्य सदाभाऊ खोत यांनी याविषयी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सतेज पाटील, प्रवीण दरेकर, अमोल मिटकरी, हेमंत पाटील, राजेश राठोड, शिवाजीराव गर्जे यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा हीच शासनाची भूमिका असल्याचे सांगत मंत्री संजय सावकारे म्हणाले, कांद्याला योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल.

Advertisement

मंत्री. सावकारे म्हणाले, राज्यात कांदा उत्पादनाच्या  व्यवस्थापन करण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. नाफेड व एनसीएफडीमार्फत सुमारे २.७७ लाख टन कांद्याची खरेदी करण्यात आली असून ४५० कोटींपैकी ४३० कोटी रुपयांचा परतावा शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. आखाती देशांमध्ये  कांदा निर्यातीला काही अडचणी असल्या तरी अन्य देशात निर्यात सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री संजय सावकारे म्हणाले,  देशातील ज्या राज्यांमध्ये कांद्याचे उत्पादन होत नाही अशा राज्यांमध्ये महाराष्ट्रातील कांदा विक्रीसाठी प्रयत्न सुरू आहेत. बाजार व्यवस्थापन आणि निर्यात वाढविण्याच्या उपाययोजनांमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळेल, असा विश्वासही मंत्री सावकारे यांनी यावेळी व्यक्त केला.

Comments

No comments yet.