नाशिक, (प्रतिनिधी) १० मार्च - शहरातील वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या तिघांनी अज्ञात कारणातून गळफास लावून घेत आपले जीवन संपवल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. मृतांमध्ये एका १७ वर्षीय युवतीचा समावेश असून, अन्य दोन घटनांमध्ये एका प्रौढाने हॉटेलमध्ये तर एकाने राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी गंगापूर, इंदिरानगर आणि म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पहिली घटना: १७ वर्षीय युवतीची आत्महत्या
मूळची छत्रपती संभाजीनगर येथील असलेली ऋतूजा पुंडलीक लाड (१७, सध्या रा. गीतांजली सोसा., पंपिंग रोड) ही युवती शिक्षणासाठी नाशिकमध्ये राहत होती. शनिवारी (दि. ७) रात्री अज्ञात कारणातून तिने राहत्या खोलीत पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. गंगापूर पोलीस ठाण्याचे हवालदार लोंढे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दुसरी घटना: हॉटेलच्या खोलीत संपविले जीवन
दुसरी घटना कमोदनगर भागात घडली. निलेश मोहन शेटे (४१, रा. बडदेनगर) या व्यक्तीने रविवारी (दि. ८) महामार्गावरील सर्व्हिस रोडला असलेल्या हॉटेल गपशपमध्ये रूम बुक केली होती. रूम नंबर १०४ मध्ये थांबलेले असताना सायंकाळच्या सुमारास त्यांनी पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला. त्यांचे भाऊ वैभव शेटे यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. इंदिरानगर पोलीस ठाण्याचे जमादार साळी पुढील तपास करत आहेत.
तिसरी घटना: पेठ रोड भागात प्रौढाचा गळफास
तिसरी घटना यशोदानगर भागात घडली. येथील रहिवासी संतोष किसन देशमुख (५५) यांनी शनिवारी (दि. ७) सकाळी आपल्या राहत्या घरातील किचनमध्ये पंख्याला दोरी बांधून आत्महत्या केली. पत्नी गायत्री देशमुख यांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवले, मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. म्हसरूळ पोलीस ठाण्याचे हवालदार गवारे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
कारणे अद्याप अस्पष्ट: या तिन्ही घटनांमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून, आत्महत्येच्या वाढत्या घटनांमुळे चिंता व्यक्त होत आहे.
नाशिक : विनाकारण मारहाण करीत युवकास लुटण्यात आल्याचा प्रकार सातपूर गावात घडला. या घटनेत तरूणाच्या खिशातील दोन हजाराची रोकड बळजबरीने काढून घेत भामट्यांनी पोबारा केला असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनू काळे, भाऊड्या काळे व भास्कर दहाडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत गोरक्ष निवृत्ती जाधव (३१ रा.मुंगसरा ता.जि.नाशिक) या युवकाने याबाबत फिर्याद दिली आहे. गोरक्ष जाधव हा गेल्या शुक्रवारी (दि.६) रात्री सातपूर गावात गेला होता. रस्त्याने तो पायी जात असतांना संशयितांनी त्याची वाट अडविली. यावेळी कुठलेही कारण नसतांना त्रिकुटाने त्यास शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत जाधव याच्या खिशातील दोन हजार रूपयांची रोकड बळजबरीने काढून घेत भामट्यांनी पोबारा केला असून अधिक तपास उपनिरीक्षक न्याहळदे करीत आहेत.