नाशिक, (प्रतिनिधी) ९ मार्च - रंगपंचमीचा सण साजरा करत असताना किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारी आणि विनयभंगात झाल्याची धक्कादायक घटना नानावली भागात घडली आहे. इमारतीच्या आवारात रंग खेळताना हातातील अंडा जमिनीवर पडल्याच्या रागातून शेजाऱ्याने महिलेला मारहाण करत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयित कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, नानावली येथील प्रज्ञानगर भागात पीडित महिला आणि संशयित एकाच सोसायटीत राहतात. रविवारी (दि. ८) सर्वत्र रंगपंचमीचा उत्साह असताना सोसायटीच्या आवारात रंगांची उधळण सुरू होती. यावेळी खेळता खेळता पीडित महिलेच्या हातातील अंडा इमारतीच्या आवारात जमिनीवर पडले. या क्षुल्लक कारणावरून संशयित मुजाहीद याने वादावादी सुरू केली.
कुटुंबियांकडून मारहाण
जमिनीवर अंडा का फोडला, या रागातून संशयित मुजाहीद याने पीडितेला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असता, मुजाहीदसह त्याच्या भावाने, आईने आणि बहिणीने मिळून पीडितेला मारहाण केली. याच दरम्यान मुजाहीदने पीडितेचा विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलिसांनी संशयित मुजाहीद, त्याचा भाऊ, आई आणि बहीण अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सणासुदीच्या दिवशी शेजाऱ्यांमध्ये झालेल्या या वादामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस उपनिरीक्षक शेख या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.