नाशिक, (प्रतिनिधी) ७ मार्च - शहरातील वडाळा परिसरातील रवी शंकर मार्गावर गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एका ४६ वर्षीय दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव मालट्रकने पाठीमागून दिलेल्या धडकेमुळे हा अपघात घडला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद कुमार बलवंता विश्वकर्मा (४६, रा. गोरेगाव, मुंबई) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पवन विश्वकर्मा (रा. साईबाबानगर, सिडको) यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी ट्रक चालक विनोद दुखभजन मौर्या (३८, रा. आळंदीफाटा, चाकण, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत विनोदकुमार विश्वकर्मा हे गुरुवारी (दि. ५) सायंकाळच्या सुमारास आपल्या दुचाकीने (क्र. MH 02 CN 5309) वडाळा गावाच्या दिशेने जात होते. रवी शंकर मार्गावरील 'गणेश सिग्नीफिया' या इमारतीसमोरून जात असताना, पाठीमागून आलेल्या भरधाव मालट्रकने (क्र. MH 14 LX 8220) त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली.
गंभीर जखमी अन् मृत्यूशी झुंज अपयशी
ही धडक इतकी भीषण होती की, विश्वकर्मा रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तसेच त्यांच्या डाव्या मांडीवरून ट्रकचे चाक गेल्याने पाय मोडला होता. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे हवालदार गारले या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.