नाशिक, (प्रतिनिधी) ६ मार्च - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या सन 2026-27 च्या राज्य अर्थसंकल्पात नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या विविध महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. जलव्यवस्थापन, धार्मिक पर्यटन, पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि कुंभमेळ्याच्या तयारीसाठी भरीव तरतूद करण्यात आल्याने जिल्ह्याच्या विकासाला नवसंजीवनी मिळणार असल्याचे चित्र या अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले आहे.
‘प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन’ या चार स्तंभांवर आधारित विकसित महाराष्ट्राच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून विविध क्षेत्रांमध्ये व्यापक विकासाची दिशा यातून ठरविण्यात आली आहे.
नाशिक येथे राज्य जल माहिती केंद्र
राज्यातील जलसंपत्तीचे प्रभावी नियोजन, व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जलस्रोतांचे नियमन करण्यासाठी नाशिक येथे राज्य जल माहिती केंद्र स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या केंद्रासाठी 71.20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून जलसंपत्तीची डिजिटल व प्रमाणित माहिती उपलब्ध करून देण्यास या केंद्राची मदत होणार आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी भरीव निधी
जगप्रसिद्ध नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, व्यवस्थापन आणि विकास कामांसाठी अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर आणि परिसरातील विविध विकास कामांना गती मिळणार आहे.
रामकाल पथ विकास प्रकल्पाला गती
नाशिक शहराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाला अधोरेखित करणाऱ्या रामकाल पथ विकास प्रकल्पाची कामे सुरू असल्याचे अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच शहराच्या पर्यटन क्षमतेत लक्षणीय वाढ होणार आहे.
नाशिक विमानतळ विस्तारासाठी निधी
राज्यातील हवाई संपर्क अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने नाशिक विमानतळाच्या विस्तारासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे उद्योग, पर्यटन आणि गुंतवणूक वाढीसाठी महत्त्वाची मदत होणार आहे.
नाशिक ‘ग्रोथ हब’ म्हणून विकसित होणार
मुंबई महानगराच्या धर्तीवर पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे ग्रोथ हब विकसित करण्याची योजना अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली आहे. या माध्यमातून औद्योगिक गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि शहरी विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
पीक कर्ज माफीच्या निर्णयाचा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार
याशिवाय अर्थसंकल्पात राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची दिलासा देणारी घोषणा करण्यात आली असून दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर आर्थिक मदत देण्याची तरतूद करण्यात आली आहे. कांदा, द्राक्ष आणि भाजीपाला उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ राज्यातील महिलांप्रमाणेच नाशिक जिल्ह्यातील पात्र महिलांनाही मिळणार आहे.
तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात रस्ते, वाहतूक व्यवस्था, नदीघाट विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा आदी पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी नियोजन करण्यात आले आहे. या विकासकामांमुळे भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला व रोजगार निमिर्तीला मिळणार चालना
औद्योगिक विकासालाही चालना देण्यासाठी राज्य शासनाने उद्योगांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर दिला असून नाशिक-सिन्नर-ओझर औद्योगिक पट्ट्यात गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यामुळे रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
शेती, पायाभूत सुविधा आणि ग्रामीण विकासाला चालना
राज्याच्या कृषी विकासासाठी विविध योजना जाहीर करण्यात आल्या असून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना, सौर कृषी पंप योजना, कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर तसेच शेतीमालाच्या मूल्यसाखळी विकासाचे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आदींच्या माध्यमातून ग्रामीण भागातील संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्यात येणार आहे.
विकसित महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल
सन 2026-27 च्या अर्थसंकल्पात 7 लाख 69 हजार 467 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून राज्याची अर्थव्यवस्था 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे. उद्योग, सेवा आणि कृषी क्षेत्राच्या समन्वित विकासातून महाराष्ट्राला अधिक सक्षम आणि विकसित करण्याचा शासनाचा निर्धार या अर्थसंकल्पातून स्पष्ट होत आहे.
या अर्थसंकल्पातील विविध घोषणा आणि योजनांमुळे नाशिक जिल्ह्यात जलव्यवस्थापन, धार्मिक पर्यटन, औद्योगिक विकास आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात व्यापक प्रगती होण्याची तसेच कृषी, उद्योग, महिला सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.