भोंगऱ्या बाजारात आदिवासी संस्कृतीच्या अस्मितेचा जल्लोष... अशी आहे काठीच्या राजवडी होळीची प्रथा...

Share:
Main Image
Last updated: 03-Mar-2026

नंदुरबार, (प्रतिनिधी) ३ मार्च - धडगाव येथे होळीच्या पार्श्वभूमीवर भरलेल्या पारंपरिक भोंगर्‍या बाजारातील शोभायात्रेत राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी आदिवासी बांधवांसोबत ढोल-ताशांच्या ठेक्यावर नृत्य करत सहभाग नोंदविला. यावेळी नंदुरबार जिल्ह्यात साजरी होणाऱ्या काठीच्या राजवडी होळीच्या ब्रॅंडिंगसाठी आदिवासी विकास विभागामार्फत सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी ढोलताशांच्या गजरात, हातात धाऱ्या शस्र उंचावून ठेका धरत त्यांनी घेतलेला सहभाग उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरला.

होळीनिमित्त भरविण्यात येणाऱ्या या भोंगऱ्या बाजाराला आदिवासी समुदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या बाजारात होळी सणासाठी लागणारे साहित्य, पारंपरिक वस्तू तसेच स्थानिक उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होते. त्यामुळे हा बाजार केवळ व्यापारापुरता मर्यादित न राहता आदिवासी बांधवांच्या सामाजिक-सांस्कृतिक उत्सवाचे रूप धारण करतो.

यावेळी धडगावमधील पोलीस पाटलांची मानाची मिरवणूक काढण्यात आली. शासकीय कार्यालये तसेच शहरातील व्यापारी प्रतिष्ठानांच्या वतीने त्यांचा पारंपरिक पद्धतीने सन्मान करण्यात आला. डोंगरदऱ्यांतून मोठ्या संख्येने आदिवासी बांधव या सोहळ्यात सहभागी झाले होते.

Advertisement

आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके यांनी आमदार आमश्या पाडवी आणि आमदार राजेश पाडवी यांच्या समवेत आदिवासी समाजाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या धाऱ्या हे शस्त्र हातात घेऊन ठेका धरला. या प्रसंगाने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी बोलताना मंत्री डॉ. उईके म्हणाले, “आदिवासी समाजासाठी दैव-दैवत, परंपरा आणि अस्मिता यांना विशेष महत्त्व आहे. होळीच्या माध्यमातून आदिवासींचा गौरवशाली इतिहास आणि संस्कृती जिवंत ठेवण्याचे काम होत आहे. या परंपरांना शासनाचे पाठबळ देण्यासाठीच मी भोंगर्‍या बाजारात सहभागी झालो आहे.”

धडगावचा भोंगर्‍या बाजार हा परंपरा, व्यापार, सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक अस्मिता यांचा अनोखा संगम ठरत असून जिल्ह्याच्या आदिवासी जीवनपद्धतीचे जिवंत दर्शन घडविणारा आगळावेगळा लोकउत्सव म्हणून पुन्हा एकदा अधोरेखित झाला.

Comments

No comments yet.