नाशिक, (प्रतिनिधी) २८ फेब्रुवारी - नाशिक शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून शुक्रवारी (दि. २७) वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या तिघांनी आपली जीवनयात्रा संपवली. यामध्ये दोन तरुणांनी गळफास लावून, तर एकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. मृतांमध्ये एका १२ वर्षीय शाळकरी मुलाचा समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये आकस्मिक मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
सोमेश्वर धबधबा परिसरात विषप्राशन
पहिली घटना गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. सातपूर औद्योगिक वसाहतीतील शिवाजीनगर भागात राहणारे पुंडलिक हौसिंग जाधव (५२) हे अज्ञात कारणातून घरातून निघून गेले होते. शुक्रवारी सकाळी सोमेश्वर धबधबा परिसरातील ब्रिजच्या पोल क्रमांक २ जवळ ते विषारी औषध घेतल्याने बेशुद्धावस्थेत मिळून आले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. हवालदार पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
१२ वर्षीय मुलाचा गळफास
दुसरी मन हेलावून टाकणारी घटना चुंचाळे शिवारात घडली. दत्तनगर येथे राहणाऱ्या समीर दगडू खाटीक (१२) या अल्पवयीन मुलाने गुरुवारी रात्री राहत्या घरातील किचनमध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. त्याचे वडील दगडू खाटीक यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात हलवले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अंबड पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून हवालदार शेळके तपास करत आहेत.
नाशिकरोडला तरुणानं संपवलं जीवन
तिसरी घटना नाशिकरोड येथील कॅनॉल रोड भागात घडली. आकाश अनिल गाडे (३४, रा. लक्ष्मी ज्योत सोसायटी) या तरुणाने शुक्रवारी दुपारी राहत्या घरात पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. त्याची आई पुष्पा गाडे यांनी त्याला बिटको रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉ. प्रदीप पवार यांनी त्याला मृत घोषित केले. नाशिकरोड पोलीस ठाण्याचे हवालदार गावले या प्रकरणाचा तपास करत आहेत.
या तिन्ही घटनांमध्ये आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाने नागरिकांना मानसिक तणावाच्या काळात संवाद साधण्याचे आवाहन केले आहे.
नाशिक : रिक्षा प्रवासात मुंबईच्या वृद्धेची अडीच तोळे वजनाची सोन्याची पट्टा पोत सहप्रवासी असलेल्या भामट्या महिलेने चोरून नेली. हा प्रकार अशोकस्तंभ भागात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शालिनी सुभाष सोनार (रा.चेंबुर मुंबई) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सोनार नातेवाईकांना भेटण्यासाठी शहरात आल्या होत्या गुरूवारी (दि.२६) सकाळच्या सुमारास त्या पेठरोडवरील आरटीओ कॉर्नर येथून अशोकस्तंभ भागात जाण्यासाठी रिक्षातून प्रवास करीत असतांना ही घटना घडली. शालिनी सोनार यांचे लक्ष नसल्याची संधी साधत सहप्रवासी असलेल्या अनोळखी महिलेने त्यांच्या पिशवीत ठेवलेली पट्टा पोत आणि पाचशे रूपयांची रोकड असा सुमारे ७५ हजार ५०० रूपयांचा ऐवज हातोहात लांबविला. अधिक तपास हवालदार मुर्तरकर करीत आहेत.