संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांची माफी न मागितल्यास.... भाजपचा गंभीर इशारा...

Share:
Main Image
Last updated: 28-Feb-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २८ फेब्रुवारी - संजय राऊत हे सातत्याने बिनबुडाचे आरोप करत बरळत आसतात. व्हीएसआरचे विमान देवेंद्र फडणवीस यांच्या मालकीचे असल्याचा खोटा आरोप करणा-या राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीरपणे माफी मागायला हवी अन्यथा भारतीय जनता पार्टी त्यांना कायदेशीर नोटीस बजावेल, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी दिला. मालकीचे विमान सतत दिमतीला असायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही उद्धव ठाकरे नाहीत. उद्धव ठाकरे यांची किती खासगी विमाने आहेत ते सर्वांना सांगा आणि मग बालिश बिनबुडाचे आरोप करत बांग द्या असा सणसणीत प्रहार बन यांनी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राऊतांनी डबल ढोलकी वाजवणे बंद करावे

Advertisement

अरविंद केजरीवाल यांची पुराव्या अभावी खालच्या कोर्टामधून मुक्तता झालेली आहे यानंतर या प्रकरणात सीआयडी, सीबीआय पुढचे पाऊल टाकतील यात शंका नाही तसेच वरच्या कोर्टामध्ये या प्रकरणाचा छडा लावला जाईल. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा तपास यंत्रणावर दबाव आहे असे म्हणत डंका पिटायचा आणि केजरीवालांची मुक्तता झाली की लागलीच तपास यंत्रणा स्वायत्त असे म्हणायचे. राऊतांनी अशी डबल ढोलकी वाजवणे बंद करावे असे त्यांनी खडसावले. जर का यंत्रणांवर सरकारचा दबाव असता तर केजरीवाल निर्दोष मुक्त झाले असते का, विचार करण्याची कुवत राऊतांची असेल तर त्यांनी याचा विचार करावा असा टोलाही त्यांनी लगावला.

यावेळी बन म्हणाले की, वारंवार हवेत तीर मारून राऊत तोंडघशी पडले आहेत. दुस-यांवर पुराव्याविना आरोप करण्याऐवजी पत्राचाळ घोटाळा करत राऊतांनी सर्वसामान्यांची घरे लाटून तुंबड्या कशा भरल्या याबाबत बोलावे. व्हीएसआर कंपनीमध्ये कोणाची भागीदारी आहे हे पुराव्यासह राऊतांनी सिद्ध करावे असेही आव्हान त्यांनी दिले. अजितदादा विमान अपघात प्रकरणी दाखल झालेल्या अपघाती मृत्यू अहवालानुसार चौकशी सुरू आहे, तरीदेखील राऊत प्रसिद्धीच्या हव्यासापायी राजकीय पोळी भाजत आहेत अशी टीका त्यांनी केली.

Comments

No comments yet.