मुंबई, (प्रतिनिधी) २८ फेब्रुवारी - कायद्याचे हात लांब असतात, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. तब्बल तीन दशकांपासून केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) डोळ्यात धूळ फेकून फरार असलेल्या अनंत तांबिटकर ऊर्फ अनंत तांबेडकर याला अखेर अटक करण्यात आली आहे. १९९२ मधील स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर (SBBJ) मधील कोट्यवधींच्या आर्थिक फसवणूक प्रकरणात तो मुख्य आरोपी होता. मुंबईतील त्याच्या लपण्याच्या ठिकाणाचा छडा लावून सीबीआयने २६ फेब्रुवारी २०२६ रोजी ही कारवाई केली.
नेमके प्रकरण काय?
१९९२ मध्ये स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूरमध्ये झालेल्या मोठ्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात बनावट आर्थिक व्यवहार आणि गुन्हेगारी कट रचल्याचा ठपका अनंत तांबिटकर याच्यावर ठेवण्यात आला होता. सीबीआयने सखोल तपास करून १९९६ मध्ये न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या खटल्याच्या सुनावणीनंतर न्यायालयाने नऊ जणांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती.
आरोपपत्र दाखल होताच झाला फरार
खटल्याची प्रक्रिया सुरू असताना आणि आरोपपत्र दाखल झाल्यानंतर अनंत तांबिटकर पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला होता. न्यायालयाने त्याला 'फरार गुन्हेगार' (Proclaimed Offender) घोषित केले होते. गेल्या ३० वर्षांपासून तो आपली ओळख लपवून वावरत होता, त्यामुळे सीबीआयच्या पथकाला त्याला पकडण्यात अडचणी येत होत्या.
तांत्रिक माहितीने आवळला पाश
तब्बल ३० वर्षांनंतर, सीबीआयच्या विशेष पथकाला तांत्रिक गुप्त माहिती (Technical Intelligence) आणि प्रत्यक्ष पडताळणीद्वारे तांबिटकर मुंबईत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. अटक केल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.