राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा 'पाडवा' गोड... शासनाने केली ही मोठी घोषणा...

Share:
Main Image
Last updated: 27-Feb-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २७ फेब्रुवारी - वाढत्या महागाईच्या काळात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे आता महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून ५८ टक्के होणार असल्याची घोषणा वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे केली.
या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे ५.१६ लाख शासकीय कर्मचारी आणि ८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना (Pensioners) मिळणार असून, प्रशासकीय वर्तुळातून या निर्णयाचे स्वागत होत आहे.

फेब्रुवारीपासून रोखीने लाभ, मार्चमध्ये थकबाकी
राज्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही वाढ जुलै २०२५ पासून लागू धरण्यात येणार आहे. फेब्रुवारी २०२६ च्या वेतनापासून ही वाढीव रक्कम कर्मचाऱ्यांना रोखीने दिली जाईल. विशेष म्हणजे, जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या चार महिन्यांच्या कालावधीतील थकबाकीची रक्कम 'गुढीपाढव्या'च्या निमित्ताने मार्च २०२६ च्या वेतनातून अदा केली जाणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा सण उत्साहात साजरा होणार आहे.

महत्त्वाचे मुद्दे:
वाढीचा दर: ३% (एकूण भत्ता ५८% होईल).
अंमलबजावणी: जुलै २०२५ पासून पूर्वलक्षी प्रभावाने.
कोणाला लाभ: ५.१६ लाख कर्मचारी आणि ८.७२ लाख पेन्शनर्स.
नोव्हेंबर ते जानेवारीची थकबाकी: नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या तीन महिन्यांच्या थकबाकीबाबतचे स्वतंत्र आदेश शासन लवकरच निर्गमित करणार असल्याचेही ॲड. जयस्वाल यांनी स्पष्ट केले.

या निर्णयामुळे राज्य तिजोरीवर अतिरिक्त भार पडणार असला तरी, कर्मचारी हितासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. महागाईच्या काळात मिळालेल्या या ३ टक्के वाढीमुळे मध्यमवर्गीय सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Advertisement

Comments

No comments yet.