शेतकरी किडनी विक्रीचा मुद्दा विधिमंडळात गाजला... मुख्यमंत्र्यांसह मंत्री म्हणाले...

Share:
Main Image
Last updated: 26-Feb-2026

मुंबई (प्रतिनिधी) २६ फेब्रुवारी - चंद्रपूर जिल्ह्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याला कर्जाच्या विळख्यात ओढून, कंबोडियात नेऊन त्याची किडनी काढल्याची अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. या प्रकरणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून, दोषींवर 'मोक्का' (MCOCA) लावण्यासंदर्भात कायदेशीर चाचपणी केली जाईल, अशी माहिती गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानसभेत दिली. तसेच, अवैध सावकारी रोखण्यासाठी कायद्यात अधिक कठोर सुधारणा करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आमदार अतुल भातखळकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर राज्यमंत्री डॉ. भोयर उत्तर देत होते. या चर्चेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अर्जुन खोतकर, योगेश सागर यांसह अनेक सदस्यांनी सहभाग घेतला.

आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश
डॉ. भोयर यांनी सांगितले की, हे प्रकरण २०२१ ते २०२३ या कालावधीत घडले असून, २०२५ मध्ये तक्रार दाखल झाल्यावर ते उघडकीस आले. तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे:
९ जणांच्या किडन्यांची विक्री: एका मध्यस्थाच्या माध्यमातून एकूण नऊ जणांच्या किडन्या काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
८ आरोपींना अटक: आतापर्यंत या प्रकरणात एकूण ८ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. यामध्ये सोलापूरमधील एका सूत्रधाराचाही समावेश आहे.
देशांतर्गत धागेदोरे: केवळ विदेशातच नव्हे, तर तामिळनाडूतील त्रिची येथील एका रुग्णालयातही असा प्रयत्न झाला आहे. संबंधित रुग्णालय मालक आणि दिल्लीतील एका डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांचे कठोर निर्देश
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आरोपींची संपत्ती गोठविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या प्रकरणात संबंधित उपनिबंधकाची चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांचे निलंबन किंवा बदली करण्याचे आश्वासनही सरकारने दिले आहे.

सावकारी पाशावर आता 'वॉच'
राज्यात अवैध सावकारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने कंबर कसली आहे:
जिल्हास्तरीय समिती: जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक आणि उपनिबंधकांची समिती कार्यरत असेल.
त्रैमासिक डेटा तपासणी: परवानाधारक सावकारांनी किती दराने कर्ज दिले, याचा संपूर्ण डेटा दर तीन महिन्यांनी या समितीला सादर करणे अनिवार्य असेल.
तात्काळ कारवाई: तक्रार प्राप्त होताच विशेष पथकामार्फत छापेमारी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

"शेतकऱ्यांची अशी पिळवणूक होणे दुर्दैवी आहे. केवळ अटक करून आम्ही थांबणार नाही, तर यातील डॉक्टरांवर आणि टोळीवर अशी कारवाई करू की पुन्हा असे धाडस कोणाचे होणार नाही."
— डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री (गृह).

Advertisement

Comments

No comments yet.